कोल्हापूर : कोरोना कमी की काय म्हणून म्युकरमायकाेसिसचीही नागरिकांना लागण होऊ लागली आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या इंजेक्शन्सच्या किमतीने एकीकडे नातेवाइकांचे कंबरडे मोडायला लागले असून दुसरीकडे ते विकत घेण्यासाठी मध्यरात्रीपासून रांगेत झोपण्याची वेळ आली आहे. जिल्हा आणि आरोग्य प्रशासनाने यातून काही तरी मार्ग काढण्याची गरज आहे.
म्युकरमायकोसिसच्या उपचारामध्ये लिपोसोमल एम्फोटिसिन बी या इंजेक्शन्सची अतिशय गरज असते. मात्र या इंजेक्शन्सचीही रेमडेसिविरप्रमाणे टंचाई आहे. सीपीआरच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या औषधाच्या गोदामामधून ही इंजेक्शन्स वितरित केली जातात.
शासकीय रुग्णालयातील आवश्यक रुग्णांना इंजेक्शन्स दिल्यानंतर मग ज्यांनी येऊन मागणी नोंदवली आहे त्यांना उपलब्ध इंजक्शन्सपैकी शक्य आहे तेवढी दिली जातात. या टंचाईमुळे मात्र या ठिकाणी आपला आधी नंबर लागावा म्हणून रूग्णाचे नातेवाईक रात्रीच या ठिकाणी रांगेत झोपू लागले आहेत. हा नंबर लावल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता संबंधित अधिकारी, कर्मचारी येतात. ऑनलाईन पैसे भरून घेतले जातात आणि पुन्हा तीननंतर इंजेक्शन्स नेण्यासाठी या असे सांगितले जाते.
चौकट
रात्री अंथरूण घेऊनच रांगेत
अनेक रुग्णांच्या नातेवाईक असलेल्या महिला संध्याकाळी येथे येतात. रात्र होईपर्यंत थांबतात आणि रात्री दुसऱ्या नातेवाईकांना या ठिकाणी झोपण्यासाठी पाठवतात. आता तर काहीजण रात्रीच आपली दुचाकी गाडी रांगेत लावून जात आहेत. इंजेक्शनच्या टंचाईमुळे नागरिकांवर ही वेळ आली आहे. म्हणूनच जादा इंजेक्शन्साठी नेत्यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.
चौकट
दागिने गहाण टाकून इंजेक्शन्स खरेदी
या इंजक्शन्सचे संपूर्ण नियंत्रण हे शासनाकडे असल्याने नागरिकांना येथून विकत इंजेक्शन्स दिली जात आहे. एका डोसची किंमत साडे चार हजारपासून नऊ हजारपर्यंत असल्यामुळे रूग्णांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत. काहींनी सोन्याचे दागिने गहाण ठेवून ही इंजेक्शन्स नेण्यासाठी पैसे उभे केले असल्याचे सांगितले.
कोट
आपल्या घरातील रूग्ण बरा व्हावा म्हणून कुठुन तरी पैसे गोळा करून नातेवाईक ही इंजेक्शन्स खरेदी करत आहेत. आपला नंबर लागावा म्हणून रांगेत रात्रीच येऊन झोपत आहेत. नागरिकांचा अंत पाहणारी ही पध्दत असून यावर प्रशासनाने मार्ग काढण्याची गरज आहे.
श्रीकांत पाटील
म्हाकवे (ता.कागल), रूग्णाचे नातेवाईक
२८०५२०२१ कोल सीपीआर ०१
कोल्हापुरात म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शन खरेदीसाठी नंबर लावण्यासाठी अशा पध्दतीने नागरिक रात्रीच सीपीआर गोदामाच्या बाहेर येवून झोपत आहेत.