कोल्हापूर : जिल्ह्यावर कोणतीही आपत्ती आली की दातृत्वाचे हजारो हात पुढे येतात, प्रशासनाला पाठबळ देत ही लढाई यशस्वी करण्याचा गुण कोल्हापूरकरांच्या रक्ताचच असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. महापुरावेळी जिल्हा प्रशासनाने २२ महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या कोल्हापूर डिझास्टर रिलिफ फंडात तब्बल ५ कोटी ७४ लाख ३७ हजार इतकी घसघशीत मदत जमा झाली आहे. या मोलाच्या मदतीमुळे प्रशासनाला महापुरासह कोरोनाविरुद्ध लढण्याचे बळ मिळाले.
रांगडे, खवय्ये कोल्हापूरकर दातृत्व आणि एखाद्याला आपल्याकडून अधिकाधिक मदत करण्यातही तितकेच आघाडीवर आहेत. जिल्ह्यावर कोणतीही आपत्ती येवो व्यक्ती, सामाजिक संस्थांसोबतच अनेकजण वैयक्तिकस्तरावर स्वत:च्या क्षमतेनुसार मदत करायला पुढे येतात. म्हणूनच ज्यांच्यावर आपत्ती येते त्यांची जगण्याची लढाई सोपी होते. ऑगस्ट २०१९मध्ये न भुतो न भविष्यती असा महापूर आला. या आपत्तीतून सावरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ऑगस्ट २०१९मध्ये कोल्हापूर डिझास्टर रिलीफ फंड सुरू केला व नागरिकांना मदतीचे आवाहन केले. तेव्हापासून आजतागायत या फंडासाठी तब्बल ५ कोटी ७४ लाखांचा निधी जमा झाला. अनेकांनी प्रत्यक्ष, नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर व कित्येक नागरिकांनी परस्पर शक्य तितकी रक्कम या खात्यावर पाठवली आहे.
---
या कारणासाठी खर्च
या निधीतून महापूरग्रस्तांना मदत, एनडीआरएफच्या पथकासाठी इंधन व अन्य सोयीसुविधा, कोरोना काळात वैद्यकीय साहित्याची खरेदी, लॅब टेक्निशियनचे मानधन, आशा सेविकांना भत्ता, काही निधी महापालिका व काही निधी जिल्हा परिषदेलाही देण्यात आला. याशिवाय अत्यावश्यकच पण शासनाच्या अन्य कोणत्याही खर्चाच्या चौकटीत बसू न शकणाऱ्या बाबींसाठीचा खर्च या निधीतून करण्यात आला आहे.
--
कोल्हापूर डिझास्टर रिलीफ फंडात जमा झालेली रक्कम : ५ कोटी ७४ लाख ३७ हजार ५१
महापूर व कोरोनासाठी खर्च झालेली रक्कम : ५ कोटी ३७ लाख ६२ हजार ६७१
शिल्लक रक्कम : ३६ लाख ७४ हजार ४२९
---
जिल्हा प्रशासनावर दृढ विश्वास
दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुरावेळी जिल्हा प्रशासनाने झोकून देऊन काम केले व लोकांचे प्राण वाचवले. त्यासाठी महापालिका-पोलीस प्रशासन आणि जिल्हा परिषदेचेदेखील मोलाचे सहकार्य लाभले. गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेतही एकीकडे नागरिकांची सुरक्षितता तर दुसरीकडे रुग्णांना सर्व वैद्यकीय सेवा, परस्थ नागरिकांची सोय, वंचितांना सहाय्य मिळवून देेेण्याचे काम केले. आता दुसऱ्या लाटेतदेखील प्रशासन उत्तम काम करत असल्याने कोल्हापूरकरांचा प्रशासनावर दृढ विश्वास आहे.
---
ही आहेत मदतीची कारणे
- दातृत्व आणि नडलेल्याला सर्वप्रकारची मदत करणे हा तर कोल्हापूरकरांचा वसाच आहे.
- जिल्हा प्रशासन करत असलेल्या धडपडीला बळ
- महापूर आणि कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रशासनाने नेटाने पार पाडलेल्या जबाबदाऱ्या
- आपण दिलेला प्रत्येक रुपया योग्य कारणासाठीच खर्च होणार याची खात्री
---
येथे करु शकता मदत
कोल्हापूर डिझास्टर रिलीफ फंड
बँक ऑफ इंडिया, शाहुपूरी शाखा,
खाते क्रमांक : ०९०११०११००१८७३०
आयएफएससी कोड : BKID००००९०१
--