प्रदीप शिंदे ।कोल्हापूर : सततचा एकलकोंडेपणा आणि नैराश्य या स्मृतिभ्रंशाला निमंत्रण देणाऱ्या परिस्थिती आहेत. उत्साही व सकारात्मक माणसांचा गोतावळा भोवताली असेल तर या आजाराला वेळीच वेसण घालून दूर ठेवता येते. मात्र, आजच्या धावपळीच्या युगात ज्येष्ठांशी चार गोष्टी बोलण्यासाठी कोणाला वेळ नाही. त्यामुळे अनेकजण ‘स्मृतिभ्रंश’ (अल्झायमर) आजाराने त्रस्त होत आहेत असेच थकलेले हात एकत्र येऊन आणि संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अशा लोकांसाठी पुन्हा जगण्यासाठी ताकद एकवटली आहे.
ज्येष्ठ नागरिकांनी निरामय, सुखी, आनंदी जीवन जगावे, हा उद्देश घेऊन महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे काम केले जाते. संघटनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्याही सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात. हे काम करीत असतानच आपल्याच ‘साठी’ ओलांडलेल्या सवंगड्यांना ‘स्मृतिभ्रंश’ (अल्झायमर) आजार जडत असल्याचे लक्षात आले.
वाचणे, लिहिणे, बोलणे, चालणे यांची क्षमता कमी होत जाते. घरचा पत्ता विसरणे, नैसर्गिक विधीही न समजणे, या गोष्टी वयोपरत्वे होणारा विसराळूपणा समजून त्याकडे दुर्लक्ष होते. मात्र हेच दुर्लक्ष पुढे जाऊन गंभीर स्वरूप धारण करते. शेवटी स्नायूंच्या ºहासामुळे सर्व हालचाली मंदावतात व रुग्ण बिछान्यात पडून राहतो; तसेच मनुष्य पूर्वीच्या सर्वच गोष्टी विसरतो. सध्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये ‘अल्झायमर’ या आजाराची लक्षणे जास्त दिसत आहेत. या आजाराबाबत जनजागृती व योग्य उपचारपद्धतीची माहिती देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे पुढाकार घेतला आहे.आज पहिले पाऊलजिल्ह्यात सहा लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. या आजाराबाबत अनेकांना माहिती नसल्याने, योग्यवेळी उपचार होत नसल्याने हा आजार वाढत जाण्याचे प्रमाण जास्त आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी आज, २१ सप्टेंबरला ‘जागतिक स्मृतिभ्रंश दिना’निमित्त ज्येष्ठ नागरिक संघातर्फे पुढाकार घेतला आहे. सागरमाळ ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने जिल्ह्यातील हा असा पहिलाच उपक्रम राबवत प्रतिभानगर येथील हुतात्मा स्मारक येथे ‘स्मृतिभ्रंश’ या विषयावर विशेष व्याख्यान ठेवले आहे. दुपारी ४ वाजता होणाºया कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत, असे अध्यक्ष दिलीप पेटकर यांनी सांगितले तसेच याबाबत पत्रके वाटून जनजागृती केली जाणार आहे.
सेवानिवृत्तीनंतर बहुतांश ज्येष्ठांसमोर वेळेची पोकळी कशी भरावी, हे सर्वांत मोठे आव्हान असते. त्यातून अनेक वेळा स्मृतिभ्रंशासारखा आजार ज्येष्ठांना जडत आहे. अशा व्यक्तींना समजून घेऊन त्यांच्यातील एकलकोंडेपणा दूर करण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकाचे योगदान मोलाचे आहे.- प्राचार्य डॉ. मानसिंग जगताप, विभागीय अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक महासंघ
स्मृतिभ्रंश (अल्झायमर) हा टप्प्याटप्प्याने वाढत जाणारा मेंदूशी संबंधित आजार आहे. वयानुसार शरीराची झीज झाल्याने ठरावीक लोकांमध्ये हा आजार बळावल्याचे दिसून येते. त्यामुळे साठी ओलांडलेल्या ज्येष्ठांनी शक्य तितका वेळ कुटुंबातील व्यक्तींशी संवादी किंवा आपल्या आवडत्या छंदात सतत मन गुंतवून ठेवणे गरजेचे आहे.- डॉ. पवन खोत, विभागप्रमुख, मानसोपचार विभाग, सीपीआर रुग्णालय