कोल्हापूर : तिरुपती देवस्थानच्यावतीने गुरुवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईला १ लाख १० हजार रुपये किंमतीचा सोनेरी रंगाचा आणि लाल काठाचा मानाचा शालू गुरुवारी अर्पण करण्यात आला. यावेळी तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बारेड्डी यांनी महाराष्ट्र शासनाने नवी मुंबईत दिलेल्या १२ एकर जागेत तिरुपतीप्रमाणे बालाजीचे भव्य मंदिर उभारले जाणार असल्याचे जाहीर केले. तसेच तिरुपतीला येणाऱ्या कोल्हापुरातील भाविकांसाठी धर्मशाळा उभारण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.आदिशक्ती म्हणून तिरुपती देवस्थानच्यावतीने दरवर्षी नवरात्रोत्सवात देशभरातील शक्तीपीठांना मानाचा शालू अर्पण केला जातो. या परंपरेनुसार गुरुवारी दुपारी बारा वाजता तिरुपती देवस्थाचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बारेड्डी व त्यांच्या पत्नी वाय. व्ही. सुवर्णा यांनी पारंपारिक वाद्यांच्या गजरात अंबाबाईसाठी मानाचा शालू आणला.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने सचिव शिवराज नाईकवाडे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी तिरुपती देवस्थानचे सदस्य म्हणून मिलिंद नार्वेकर, सौरभ वारा, हेमीरेड्डी प्रशांती, अरुण दुधवडकर, के. रामाराव यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव उपस्थित होते.
Navratri2022: अंबाबाईला तिरुपती देवस्थानचा मानाचा शालू अर्पण
By इंदुमती सूर्यवंशी | Published: September 29, 2022 5:52 PM