कोल्हापूर : नारंगी रंग, त्यावर सोनेरी जरीकाठ आणि बुट्ट्यांचा सुंदर शालू बुधवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईला अर्पण करण्यात आला. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सवानिमित्त आदिशक्ती आणि देशातील ५१ शक्तिपीठांतील देवता असलेल्या अंबाबाईला आईच्या भावनेतून शालू अर्पण केला जातो.विष्णूवर रागावून श्री लक्ष्मी कोल्हापुरात आपली आई आदिशक्ती अंबाबाईकडे आली. अंबाबाईच्या कृपेमुळे विष्णूला तिरुमला तिरुपती येथे पत्नी लक्ष्मी भेटली, अशी या क्षेत्राची महिमा आहे. त्यामुळे दरवर्षी तिरुपती देवस्थानच्या वतीने अंबाबाईला नवरात्रोत्सवात मानाचा शालू अर्पण केला जातो.आज, बुधवारी सकाळी १० वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात तिरुपती देवस्थानचे सदस्य मिलिंद नार्वेकर, राजेशकुमार शर्मा यांनी अंबाबाईला शालू अर्पण केला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने सचिव सुशांत बनसोडे यांच्याकडे शालू सुपुर्द करण्यात आला.यावेळी तिरुपती देवस्थानचे समन्वयक के. रामाराव, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, सहसचिव शीतल इंगवले यांच्यासह देवस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.शालू लाखमोलाचा..नारंगी रंगाचा व सोनेरी काठाच्या या शालूची किंमत १ लाख ६ हजार ५७५ इतकी आहे. या शालूसोबतच मिलिंद नार्वेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडील ओटीही अंबाबाईला अर्पण केली.
कोल्हापूरच्या अंबाबाईला तिरुपती देवस्थानचा शालू अर्पण, शालूची किंमत किती..जाणून घ्या
By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 18, 2023 2:09 PM