कोल्हापूर : यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक पारंपरिक महाद्वारसह हॉकी स्टेडियम, उमा टॉकीज ते पापाची तिकटी या तीन मार्गावरून निघेल. महाद्वार सोडून पर्यायी दोन मार्गांनी जाण्यास शहरातील बहुतांशी मंडळांनी मान्यता दिली आहे. जी मंडळे जाणार नाहीत, त्यांच्यामधून लकी ड्रॉच्या माध्यमातून चिठ्ठ्या काढून महाद्वार रोडवर प्रवेश दिला जाईल. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच शहरातील प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय त्याचे नियोजन केले जाईल, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी मंगळवारी दिली.
विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनासाठी शाहू स्मारक भवनात आयोजित गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बलकवडे म्हणाले, पर्यायी मार्गाने मिरवणूक नेण्यासाठी प्रमुख आणि नामांकित मंडळांनी पुढाकार घ्यावा. विसर्जन मिरवणुकीची कोल्हापूरला चांगली परंपरा आहे. त्याला कुठेही गालबोट लागू नये. मिरवणुकीवेळी कोणावरही पोलीस चुकीची कारवाई करणार नाहीत. कोणी सांगितले म्हणूनही गुन्हे दाखल होणार नाहीत. पर्यायी मार्गासंबंधीचा व्हिडिओ मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या मोबाईल नंबरवर पाठविला जाईल. गणराया अवॉर्ड स्पर्धेत मिरवणुकीत महिलांची संख्या अधिक असलेल्या मंडळांना आणि मद्यपान न करता मिरवणूक शिस्तबद्धपणे काढणाऱ्या मंडळांना विशेष बक्षीस दिले जाईल.
बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यासह शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे निरीक्षक उपस्थित होते.
पारंपरिक विसर्जन मिरवणुकीचा मार्ग असा :
खासबाग मैदान, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळा टॉवर, क्रशर चौक, इराणी खण
पर्यायी मार्ग क्रमांक १ : सुभाष रोडवरील सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, गोखले कॉलेज, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर चौक, क्रशर चौक, इराणी खण.
पर्यायी मार्ग क्रमांक २ : उमा टॉकीज, काॅमर्स कॉलेज, बिंदू चौक, शिवाजी चौक, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळा टॉवर, तांबट कमान ते इराणी खण.
पर्यायी मार्ग कशासाठी आवश्यक..
- मंडळाची आणि मिरवणूक पाहणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने महाद्वार रोडची क्षमता समाप्त
- महाद्वार रोडवरील वाढती गर्दी कमी करणे.
- सायंकाळी ७ ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंत होणारी चेंगराचेंगरी टाळणे
- महिला, लहान मुलांना विसर्जन मिरवणुकीचा आनंद सुलभपणे घेता यावा
- गर्दीमुळे होणारे वाद-विवाद, ढकला-ढकली, छेडछाडीचे प्रकार रोखणे.
पर्यायी मार्गावरून जाणाऱ्यांना महाद्वार रोडवर बंदी
पर्यायी दोन मार्गांवरून मिरवणूक काढणाऱ्या गणेश मंडळांना महाद्वार रोडवर येता येणार नाही. त्यामुळेच काही मंडळांकडून पर्यायी मार्गांना विरोध होत आहे. महाद्वार रोडवरील गर्दी टाळण्यासाठी पोलीस प्रशासन यावेळी कोणत्याही परिस्थितीत राजारामपुरीसह त्या परिसरातील मंडळांना पर्यायी मार्गाने जाण्यास भाग पाडणार आहेत. जे जाण्यास विरोध करून महाद्वार रोडवर येतील, त्यांना किती वेळात पुढे जायचे यासंबंधीची बंधने घालण्यात येणार आहेत
गंगावेशलाच मिरवणूक समाप्त
गंगावेश हा विसर्जन मिरवणुकीचा शेवटचा पाॅईंट असेल. त्यामुळे तेथून इराणी खणीकडे जाताना फक्त मूर्ती व कार्यकर्तेच जातील. कोणत्याही साऊंड सिस्टीमला परवानगी दिली जाणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
साऊंड सिस्टीमला रात्री १२ पर्यंतच परवानगी
विसर्जन मिरवणुकीत साऊंड सिस्टीमच्या आवाज नियमांप्रमाणेच ठेवावा. रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, अर्भकांना जास्त आवाजाचा त्रास होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. रात्री १२ पर्यंतच साऊंड सिस्टीमला परवानगी आहे. त्यानंतर सिस्टीम बंद करावी अन्यथा कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी दिला.
मंडळांचे पदाधिकारी म्हणतात,
- रवीकिरण इंगवले : पर्यायी मार्गाबाबत संभ्रम आहे. तो पोलीस प्रशासनाने दूर करावा. विसर्जन मिरवणुकीदरम्यान राजकीय द्वेषातून, कोणीतरी राजकीय व्यक्ती सांगितली म्हणून कारवाई करू नये.
- आर. के. पोवार : महाद्वार रोड या मिरवणूक मार्गावर ३२ धोकादायक इमारती आहेत. त्या इमारतीजवळ फलक लावावा. पर्यायी मार्ग मंडळांना समजून सांगावा.
- अनिल कदम : शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याना ओळखतील असे पोलीस मिरवणूक बंदोबस्तामध्ये असावेत.
- बाबा पार्टे : गंगावेशपासून पुढेही साऊंड सिस्टीमला परवानगी द्यावी.
- बंडा साळुंखे : मिरवणुकीत मद्यपान करून आल्यास त्यांच्यावर कारवाई करा
- राजू जाधव : महाद्वार रोडवर मिरवणूूक रेंगाळू नये. मिरवणुकीचा हा मार्ग एकेरी करावा.