कोल्हापूर : उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार गेल्या तीन दिवसांत १२०० हून अधिक एस.टी. कर्मचारी कामावर परतले असून, आता परतलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ३ हजार ९७२ इतकी झाली आहे, तर उर्वरित २९५ कर्मचारी येत्या दोन दिवसांत कामावर हजर होण्याची शक्यता आहे.एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे. या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचारी ३ नोव्हेंबर २०२१ पासून बेमुदत संपात सहभागी झाले. त्यात कोल्हापूर विभागातील कर्मचारीही सहभागी झाले. टप्प्याटप्प्याने त्यातील काहींनी माघारी परतणे पसंत केले, तर काहींना संपावर ठाम राहणे पसंत केले. त्यामुळे निम्या कर्मचारी संख्येवर कोल्हापूर विभागाचा गाडा सुरू झाला.उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या पाठबळावर विभागानेही जोतिबा यात्रा व पर्यटक, भाविकांसाठी मुंबई, पुणे, कोकण, गोवा, आदी मार्गावर जादा बसेसही सोडल्या. यादरम्यान उच्च न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आदेश दिले. त्यामुळे गेल्या तीन दिवसांमध्ये १२०० हून अधिक चालक, वाहक, कार्यशाळा कर्मचारी कामावर परतले आहेत, तर उर्वरित कर्मचारीही आज, गुरुवारी कामावर परतणार आहेत. कोल्हापूर विभागात एकूण ४२६७ कर्मचारी संख्या आहे. त्यापैकी आजअखेर ३९७२ कर्मचारी कामावर परतले आहेत.
कोल्हापूर विभागाची सध्याची कर्मचारी संख्या अशी
- प्रशासकीय - ४४९
- कार्यशाळा - ७४१
- चालक - ८६९
- चालक तथा वाहक - १७
- वाहक - ९८२
- एकूण कर्मचारी संख्या ३९७२