लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’साठी सोमवारी सर्व गटातील २३ जणांनी माघार घेतली. यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका अर्चना पाटील, ‘गोकुळ’चे माजी संचालक फिरोजखान पाटील, करवीरचे माजी सभापती रवींद्र मडके आदींचा समावेश आहे. आतापर्यंत ३६ जणांनीच अर्ज मागे घेतल्याने आज (मंगळवारी) अखेरच्या दिवशी माघारीसाठी तोबा गर्दी उसळणार, हे निश्चित आहे.
‘गोकुळ’च्या २१ जागांसाठी ४८२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर २४१ जणांचे ३९० अर्ज वैध ठरले. ६ एप्रिलपासून माघारीस सुरुवात झाली असली, तरी पॅनेलमध्ये संधी मिळेल, या अपेक्षापोटी माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत इच्छुकांकडून प्रयत्न राहणार आहेत. त्यामुळेच सोमवारी माघार होऊ शकली नाही. मंगळवारी शेवटचा दिवस असल्याने निवडणूक कार्यालयात तोबा गर्दी उसळणार आहे.
गटनिहाय माघार अशी - सर्वसाधारण - १६, महिला राखीव - १२, अनुसूचित जाती-जमाती - २, भटक्या विमुक्त जाती-जमाती - १, इतर मागासवर्गीय - ५.
चार तासात तीनशे अर्ज माघारीचे आव्हान
कोरोनामुळे गर्दी टाळण्याचा निवडणूक यंत्रणेचा प्रयत्न आहे. मात्र, अर्ज माघारीचा अखेरचा दिवस असल्याने किमान तीनशे अर्ज माघारी घेतले जाणार आहेत. मंगळवारी सकाळी अकरा ते दुपारी तीन या चार तासात तीनशे अर्ज माघारीचे आव्हान राहणार आहे.
निवडणूक कार्यालयात शुकशुकाट
अर्ज माघारीसाठी सोमवारी गर्दी होणार म्हणून निवडणूक यंत्रणा सक्रिय होती. मात्र, सकाळी अकरापासून एक - एक व्यक्ती माघारीसाठी येत राहिल्याने संपूर्ण कार्यालय परिसरात शुकशुकाट होता.
फोटो ओळी : ‘गोकुळ’च्या अर्ज माघारीसाठी दोनच दिवस राहिले असताना सोमवारी निवडणूक कार्यालयात शुकशुकाट होता. (फोटो-१९०४२०२१-कोल-गोकुळ) (छाया- आदित्य वेल्हाळ)