कोल्हापूर : तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे देशात दरवर्षी नऊ लाखांहून अधिक रुग्ण दगावत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातही कर्करोग झालेल्या एकूण रु ग्णांपैकी ६० टक्के रुग्ण केवळ तंबाखूजन्य पदार्थ खाणारे आहेत. त्यामुळे तंबाखू, गुटखा हे विष असूनही लोक केवळ व्यसन म्हणून जवळ करीत आहेत. ज्यांनी गुटखा, तंबाखू सोडून तीन ते चार वर्षे झाली, अशांना कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले आहे.तंबाखूजन्य विशेषत: गुटखा खाऊन कर्करोग झालेल्या रुग्णांची संख्या राज्यासह देशभरात झपाट्याने वाढू लागली आहे. यात गुटखा खाणाऱ्यांचे प्रथम गालाचे स्नायू आखडणे, त्यानंतर आतील त्वचेला चट्टे पडणे, तोंड उघडण्यात अडचणी येणे, संवेदना समजण्याची क्षमता कमी होणे, त्वचा लालसर होणे, त्वचा पांढरी पडणे, त्यानंतर तोंडातील त्वचेला जखम होणे ही कर्करोगाची प्राथमिक लक्षणे आहेत. असे रुग्ण कर्करोग तज्ज्ञांकडे वाढू लागले आहेत.
अनेक जणांचा कर्करोग अंतिम टप्प्याकडेही पोहोचत आहे. अशा रुग्णांचा तो अवयव काढून टाकण्याशिवाय पर्याय राहत नाही. तरीही लोक गुटखा, मावा, तंबाखू खाण्यात धन्यता मानत आहेत. विशेष म्हणजे विविध कर्करोगाच्या रुग्णांपैकी तंबाखू खाऊन कर्करोग झालेल्या रुग्णांची संख्या ६० टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे ‘तंबाखूविरोधी अभियान’ ही एक चळवळ म्हणून सर्वसामान्यांनी राबविणे काळाची गरज बनली आहे.
कर्करोगाबरोबर हेही रोग फ्रीतंबाखूजन्य पदार्थ खाण्यामुळे कर्करोग तर हमखास होतोच. त्यासोबत भूक मंदावणे, हृदयरोगाचा झटका, मेंदूला सातत्याने उत्तेजना दिल्यामुळे विसरभोळेपणा, मानसिक थकवा, आकलनशक्ती कमी होणे, एकाग्रता नष्ट होणे, चिडचिडेपणा येणे, अकाली वृद्धत्व येणे, त्वचेला कोरडेपणा येणे, आदी रोगही होऊ शकतात.
तोंडाचे स्कॅनिंग करून घेणे आवश्यकमी तीन वर्षांपूर्वी, तर मी चार वर्षांपूर्वी तंबाखू, गुटखा सोडला असे म्हणणारी अनेक मंडळी दिसतात. अशा रुग्णांनाही कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. कारण तोंडातील त्वचेच्या पेशी गुटखा, तंबाखू सातत्याने खाल्ल्यामुळे वर्षभरातच खराब होण्यास सुरुवात होते. त्यामुळे अशा रुग्णांनीही ‘वेलेस्कोप’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त यंत्राद्वारे तोंडाचे स्कॅनिंग करून घेणे आवश्यक बाब बनली आहे. याद्वारे अशा तंबाखू खाणाऱ्या रुग्णांना पुढे कर्करोग होणार की नाही हेही समजते.
कर्करोग पुढच्या पायरीवर गेल्यानंतर होणारा मनस्ताप रोखण्यासाठी तंबाखू खाणाऱ्या लोकांनी तज्ज्ञांकडून मौखिक तपासणी करून घेणे गरजेचे आहे. सरकारने जनजागृतीसाठी पानमसाल्याच्याही जाहिराती बंद केल्या पाहिजेत.- डॉ. अशितोष देशपांडे,सचिव, इंडियन डेंटल असोसिएशन, शाखा कोल्हापूर