कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आज, शनिवारी विविध संस्था, संघटनांच्यावतीने व्याख्याने, अभिवादन, आदी कार्यक्रमांनी साजरी होणार आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून जयंती सोहळा साजरा करण्यासाठी करवीरनगरी सज्ज झाली आहे. ऑनलाईन व्याख्याने, लेखकांशी संवाद असे कार्यक्रम होणार आहेत.
कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथे शनिवारी सकाळी आठ वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम होईल. दसरा चौक येथे सकाळी नऊ वाजता दसरा चौक येथे अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. सव्वा नऊ वाजता लाईन बाजार येथील सेवा रुग्णालयात राजर्षी शाहूंच्या तैलचित्राचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या तिन्ही कार्यक्रमांना पालकमंत्री सतेज पाटील प्रमुख उपस्थित असणार आहेत. दुपारी बारा वाजता बहुजन समाज पार्टीच्या कोल्हापूर जिल्हा युनिटतर्फे दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग येथे जयंतीचा सोहळा साजरा केला जाणार आहे. कोरोनामुळे अखिल भारतीय मराठा महासंघाने राजर्षी शाहू लेखमाला ऑनलाईन आयोजित केली आहे. स्नेहसंगीत प्रतिज्ञा मंचतर्फे ‘संवाद शाहू लेखकांशी’ हा एफबी लाईव्ह उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये ‘शाहू कादंबरीकार’ श्रीराम पचिंद्रे, ‘शाहू पोवाडाकार’ युवराज पाटील, ‘राजर्षी’ पुस्तकाचे लेखक उमेश सूर्यवंशी मार्गदर्शन करणार आहेत. आजी-माजी विद्यार्थी कृती समिती शिवाजी विद्यापीठ व मराठा ऑर्गनायझेशन यांच्यावतीने अंध कलाकारांना एक महिना पुरेल इतका शिधा दिला जाणार आहे. दि. २७ ते २९ जून दरम्यान सायबर चौक येथील आजी-माजी विद्यार्थी सहाय्यता केंद्रात रोज सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत शैक्षणिक दाखले देण्याचे शिबीर आयोजित केले असल्याची माहिती डॉ. प्रवीण कोडोलीकर आणि ऋतुराज माने यांनी दिली.
चौकट
ऑनलाईन व्याख्याने
भोसलेवाडी-कदमवाडी येथील सुसंस्कार शिक्षण मंडळातर्फे शनिवारी सकाळी आठ वाजता कॉम्रेड उमेश सूर्यवंशी यांचे व्याख्यान होईल. शिवाजी विद्यापीठातर्फे सकाळी अकरा वाजता ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे ‘शिव-वार्ता’ युट्यूब वाहिनीवर व्याख्यान होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल रिसर्च सेंटरतर्फे सकाळी अकरा वाजता ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव यांचे व्याख्यान होईल. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहायक आयुक्त ( समाज कल्याण) कार्यालयाकडून दुपारी बारा वाजता शिवशाहीर राजू राऊत यांचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित ऑनलाईन व्याख्यान होणार आहे.