कोल्हापूर : टोलवसुली सुरू करण्यापूर्वी पोलीस प्रशासनाने ज्या अटी घातल्या होत्या, त्या सर्व पूर्ण करण्याचे लेखी पत्र ‘आयआरबी’ कंपनीने पोलीस प्रशासनास दिले आहे. दरम्यान, टोलनाक्यांवर पोलिसांना बसण्या-उठण्यासाठी बांधण्यात येणार्या शेडसाठी तसेच नाक्यावरील नादुरुस्त असलेली टेक्निकल यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी उद्या, मंगळवारपासून बंदोबस्त पुरवावा, अशी लेखी मागणी ‘आयआरबी’च्या वतीने करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. टोलवसुलीसाठी ‘आयआरबी’ला पोलीस बंदोबस्त पुरविण्याचे आदेश सर्वोच्च व उच्च न्यायालयाने दिले. या आदेशाची प्रत पोलीस प्रशासनास दोनवेळा ‘आयआरबी’च्या प्रशासनाने दिली आहे. पोलीस प्रशासनाने बंदोबस्त पुरविण्याची काहीच हरकत नाही. परंतु, टोलवसुली संदर्भात जनतेमध्ये असंतोष आहे. टोलनाक्यांवर वसुली करणारे कर्मचारी हे गुंड प्रवृत्तीचे असल्याची तक्रार लोकांची आहे. त्यामुळे अशा कर्मचार्यांची तत्काळ हकालपट्टी करावी. नवीन नेमलेल्या कर्मचार्यांची पूर्ण माहिती घेऊन त्यांचे पोलिसांकडून दाखले घ्यावेत. त्यांना सक्तीचे ओळखपत्र द्यावे, त्यांच्याशिवाय कोणालाही त्याठिकाणी उभे करू नये. जूनमध्ये पावसाळ्याचे दिवस सुरू होतील. त्यामुळे टोलनाक्यांवर बंदोबस्तास असणार्या पोलिसांसाठी स्वतंत्र शेडची उभारणी करावी. त्या ठिकाणीच पिण्याच्या पाण्यासह जेवणाची सोय करावी. कारण बंदोबस्तामध्ये बहुतांश महिलांचाही समावेश आहे. अशा अटीचे पत्र पोलीस प्रशासनाने ‘आयआरबी’ प्रशासनाला दिले होते. पोलिसांच्या सर्व अटी ‘आयआरबी’ने मान्य केल्या आहेत. आंदोलन कार्यकर्त्यांनी यापूर्वी टोलनाके उद्ध्वस्त केले आहेत. जनरेटर, केबिन, कॉम्युटरचे साहित्य, शेड यासह इतर साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे टोलवसुली सुरू करण्यापूर्वी येथील टेक्निकल यंत्रणा पुन्हा बसविणे आवश्यक आहे. ती बसवत असताना पुन्हा कार्यकर्त्यांचा उद्रेक होऊन आयआरबी कंपनीच्या कर्मचार्यांना मारहाणीची शक्यता आहे. त्यामुळे टोल नाक्यांवरील यंत्रणा बसविण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची अत्यावश्यक गरज आहे तो उद्यापासून द्यावा, अशी मागणी ‘आयआरबी’च्या वतीने करण्यात आली आहे. त्यावर पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसला तरी न्यायालयाच्या आदेशानुसार उद्यापासून बंदोबस्त पुरविण्याची दाट शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आजपासून बंदोबस्ताची मागणी
By admin | Published: May 27, 2014 12:46 AM