कोल्हापूर : अबकारी कराला विरोध दर्शविण्यासाठी गेली ४० दिवस सराफ व्यावसायिकांनी केलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सच्यावतीने आज, सोमवारी सर्वपक्षीय कोल्हापूर ‘जिल्हा बंद’ची हाक दिली आहे. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आदी पक्षांसह संघटना सहभागी होत आहेत तसेच चेंबरशी संलग्न असणारे टिंबर मर्चंट, प्लायवूड असोसिएशन, स्टोन ट्रेडर्स असोसिएशन, धान्य असोसिएशन, किराणा असोसिएशन, हॉटेल मालक संघटना, केमिस्ट असोसिएशन, फूटवेअर असोसिएशन, व्यापारी असोसिएशनच्या सर्व संघटना व्यवसाय बंद ठेवून सहभागी होणार आहेत. या संपातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.सराफ व्यावसायिकांच्या बंदबाबत केंद्र सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याच्या निषेधार्थ हा कोल्हापूर ‘जिल्हा बंद’ करण्याचे पाऊल उचलले आहे. आज, सोमवारी बंद दिवशी सकाळी दहा वाजता गुजरी येथून मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली शहराच्या प्रमुख मार्गांवरून फिरणार आहे. त्यामध्ये सर्व पक्ष व उद्योग, व्यापारी संघटना सहभागी होणार आहेत. सरकारने गांभीर्याने पाहावे : ओसवालसराफ व्यवसायिकांच्या संपाबाबत सरकारने तोडगा काढला नाही. त्याचा परिणाम सराफ व्यावसायिक, सुवर्णकार व या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कारागीरांवर होत आहे. या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने पाहावे, असे प्रतिपादन भरत ओसवाल यांनी केले. याबाबत राष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या इतर घडामोडींची माहिती देण्यासाठी सराफ व्यावसायिकांची रविवारी संघाच्या कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. ओसवाल यांनी आंदोलन आणि उद्याच्या बंदविषयी विवेचन केले. यावेळी माणिक जैन, राजेश राठोड, धम्मपाल जिरगे, सुरेश ओसवाल, मनोज राठोड, सुहास जाधव, नगरसेवकर किरण नकाते, बाबा महाडिक, गजानन बिल्ले, प्रकाश बेलवलकर, सुनील मंत्री यांच्यासह सराफ व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पेट्रोल-डिझेल पंप सुरूच राहणारपेट्रोल आणि डिझेल ही सेवा अत्यावश्यक सेवेत गणली जात असल्यामुळे जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल पंप सुरू राहणार आहेत. तरीही या संपास आमचा पूर्ण पाठिंबा राहणार असल्याचे पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष गजकुमार माणगावे, सचिव किरण पाटील यांनी जाहीर केले.सराफ दुकाने बंदच राहणारआजच्या रॅलीनंतर मंगळवारपासून दुकाने सुरू होतील, अशा प्रकारचा एक संभ्रम ग्राहकांच्यात आहे. यासंदर्भात अध्यक्ष सुरेश गायकवाड आणि भरत ओसवाल यांनी सांगितले की, शिखर संघटनेच्या माध्यमातून दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तशी भेट झाल्यानंतर त्या बैठकीतील निर्णयावर स्थानिक सराफ व्यावसायिकांची मते आजमावून पुढे ‘बंद’बाबत निर्णय स्पष्ट होईल.
आज ‘जिल्हा बंद’
By admin | Published: April 11, 2016 1:17 AM