आतापर्यंत नगरविकास खाते हे विशेषत: मुख्यमंत्री यांच्याकडेच असायचे. त्यामुळे गेल्या ४२ वर्षांत महापालिकेत नगरविकास मंत्र्यांचे येणे झाले नव्हते. जेव्हा काही प्रश्न अथवा विकासकामांचे प्रस्ताव असतील तेव्हा मंत्रालयात किंवा सह्याद्री अतिथीगृहावर स्थानिक अधिकारी, पदाधिकाऱ्यांना जावे लागत होते. मात्र, एकनाथ शिंदे महापालिकेत येणारे पहिलेच नगरविकास मंत्री असतील.
शिंदे यांच्या दौऱ्यामुळे महापालिकेतील सर्व अधिकारी गुरुवारी विकासकामांचा आढावा घेण्यात तसेच प्रेझेंटेशनची तयारी करण्यात व्यस्त होते. शहरातील विकासकामांपैकी थेट पाईपलाईन योजना, अंबाबाई मंदिर परिसर विकास योजना, केशवराव भोसले नाट्यगृह दुसरा टप्पा, शाहू समाधी स्मारक स्थळ दुसरा टप्पा, सेफ सिटी, बस टर्मिनल, शाहू मिल जागेवरील स्मारक आराखडा, शहरातील क्रीडांगण, उद्याने विकास, फ्लायओव्हर आराखडा आदी विकासकामांचे सादरीकरण मंत्री शिंदे यांच्यासमोर केले जाणार आहे.
महापालिकेत मंत्री शिंदे येणार असल्यामुळे विकासकामांना गती तसेच विकास निधी मिळण्याची आशा पल्लवित झाल्या आहेत. मंत्र्यांच्या भेटीतून महापालिकेला कोणती भेट मिळणार हाच एक उत्सुकतेचा विषय आहे.