कोल्हापूर : नवीन वटहुकुमानुसार अपात्र करण्याबाबत शासनाच्यावतीने बजाविण्यात आलेल्या नोटिसांना स्थगिती देण्यास सोमवारी उच्च न्यायालयाने नकार दिल्याने जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह अकरा संचालकांवरील कारवाईची प्रक्रिया चालू राहणार आहे. याबाबत विभागीय सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांच्याकडे आज, मंगळवारी सुनावणी असल्याने याकडे साऱ्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. जिल्हा बॅँकेचे अकरा संचालक नवीन वटहुकुमाने अपात्र ठरणार आहेत. याबाबत त्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. याविरोधात बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ, निवेदिता माने यांच्यासह काही संचालकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने सरकारला म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. सरकारने ही सुनावणी खंडपीठापुढे न चालविता मुख्य न्यायाधीश यांच्यासमोर ठेवावी, मुख्य न्यायमूर्ती वाघेला व न्यायमूर्ती सोनक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. नोटिसांच्या सुरू असलेल्या प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार देतानाच न्यायालयाने याबाबतची पुढील सुनावणी २१ मार्चला होईल, असे सांगितले. यामुळे संचालक अपात्रतेबाबत सरकारने सुरू केलेली कारवाई चालू राहण्याची शक्यता आहे. याबाबत विभागीय सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांच्यासमोर आज सुनावणी आहे. मागील सुनावणीवेळी सरकारी वकील अनिल साखरे यांनी पुढील सुनावणीपर्यंत कारवाई न करण्याचे लेखी आश्वासन सादर केले होते. त्याप्रमाणे या वेळीही लेखी आश्वासन देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती संचालकांचे वकील जहागीरदार यांनी न्यायालयास केली; पण न्यायालयाने त्यास नकार देत सहनिबंधक जी कारवाई करतील, त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करा, असे आदेश दिल्याचेही समजते.
मुश्रीफांसह संचालकांच्या अपात्रतेवर आज सुनावणी
By admin | Published: March 08, 2016 12:59 AM