कोल्हापूर : यंदा संयुक्त प्रवेश परीक्षा (जॉईंट एंटरन्स एक्झाम (जेईई मेन्स) ही फेब्रुवारी ते मे महिन्यादरम्यान विविध चार सत्रांमध्ये आणि १३ भाषांमध्ये होणार आहे. परीक्षेचे स्वरूपही बदलले आहे. फेब्रुवारीतील पहिल्या सत्रामधील ऑनलाईन परीक्षेचा आज, शुक्रवार अखेरचा दिवस आहे. या चार टप्प्यांतील परीक्षांसाठी बी.ई., बी.टेक्., बी. आर्किटेक्ट, प्लॅनिंग या अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे.
पहिल्या टप्प्यातील परीक्षेचा प्रारंभ मंगळवारी (दि. २३) झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, आदी नियमांचे पालन करून परीक्षा होत आहे. जिल्ह्यातील शिये, ताराबाई पार्क, अतिग्रे, इचलकरंजी, पन्हाळा आदी सहा केंद्रांवर ऑनलाईन पध्दतीने सकाळी नऊ ते दुपारी एक आणि दुपारी दोन ते सायंकाळी सहा या दोन सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येत आहे. या टप्प्यातील परीक्षा शुक्रवारी संपणार आहे. दि. १५ ते १८ मार्चदरम्यान परीक्षेचा दुसरा टप्पा, दि. २७ ते ३० एप्रिल या कालावधीत तिसरा, तर दि. २४ ते २८ मेदरम्यान चौथा टप्पा होणार आहे. नव्या पॅटर्ननुसार या परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका आहेत. ही परीक्षा देणारे विद्यार्थी अभ्यास आणि उजळणीमध्ये मग्न आहेत. दरम्यान, कोरोनामुळे गेल्यावर्षी ही परीक्षा ऑगस्टमध्ये घेण्यात आली होती.
प्रतिक्रिया
यावर्षी चार टप्प्यांमध्ये जेईई मेन्स परीक्षा आयोजित केली आहे. बदललेल्या पॅटर्ननुसार परीक्षा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवर आवश्यक ती दक्षता घेतली जात आहे.
- वर्षा संकपाळ, संस्थापक, इन्स्पायर ॲकॅडमी.