चैत्र यात्रेचे मुख आकर्षण असणाऱ्या सासनकाठी मिरवणुकीसाठी एकही मानाची सासनकाठी लॉकडाऊनमुळे जोतिबा डोंगरावर दाखल झाली नाही. चांगभलंचा गजर नाही. डोंगरवाटा भाविकांविना शुकशुकाट दिसत आहेत. सलग दुसऱ्या वर्षीही चैत्र यात्रा भाविकांशिवाय होत आहे.
सोमवारी जोतिबा मंदिरात पहाटे तीनपासून धार्मिक विधी सोहळ्यास प्रारंभ होईल. पाच वाजता महाभिषेक महापूजा होईल. १० वाजता धुपारती सोहळा होईल.
हस्त नक्षत्रावर सायंकाळी ५.३० वाजता यावेळी तोफेच्या सलामीने जोतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे पालखी मार्गस्थ होईल. मोजक्याच पुजाऱ्यांसमवेत हा पालखी सोहळा पारंपरिक मार्गाने निघणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता यमाई मंदिरात यमाईदेवी व जमदग्नी यांच्या विवाह सोहळ्याचा धार्मिक विधी होईल. श्री जोतिबा मंदिरात येऊन तोफेच्या सलामीने रात्री दहा वाजता पालखी सोहळ्याची सांगता होईल.
कोरोना आणि चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायतीने जोतिबा डोंगरावर शंभर टक्के लॉकडाऊन केला आहे .
जोतिबा डोंगरावर आरोग्य सुविधांव्यतिरिक्त संपूर्ण लॉकडाऊन पुकारला आहे. स्थानिक नागरिकांनी पूर्णपणे प्रतिसाद देऊन १०० टक्के लॉकडाऊन केला आहे. जोतिबा डोंगरावर येणाऱ्या सर्व वाटा बंद केल्या आहेत. पायवाटेने चालत भाविक जोतिबा डोंगरावर येणार नाही याचीही दक्षता घेण्यात आली आहे. जोतिबा डोंगराभोवती असणाऱ्या गावांना भाविक जोतिबा डोंगरावर जाणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. आज, २६ एप्रिल हा चैत्र यात्रेचा मुख्य दिवस आहे. या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सलग दुसऱ्या वर्षी चैत्र यात्रा रद्द झाल्याने भाविकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. व्यापारी व पुजारी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
जोतिबा डोंगरावर ना चांगभलंचा गजर ऐकू येत आहे, ना गुलाल, खोबऱ्याची उधळण. गुलालमय होणारा डोंगर सलग दुसऱ्या वर्षीही गुलालाच्या रंगाविना फिका दिसत आहे. ज्या भाविक भक्तांचा पौर्णिमेचा उपवास असतो, तो आज, सोमवारी करावा व आपल्या देवघरात गुलाल खोबरे टाकावे. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून यात्रेची सांगता करावी, असे आवाहन समस्त पुजारी यांनी भाविकांना केले आहे.
फोटो कॅप्शन : १) जोतिबा चैत्र यात्रेच्या पूर्वसंध्येला दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची रविवारी बांधण्यात आलेली अलंकारिक खडी महापूजा.