जोतिबा : शारदीय नवरात्र उत्सवातील आज, आठव्या दिवशी दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची पाच पाकळी सोहन कमळ पुष्पातील महापूजा बांधण्यात आली. ही पूजा समस्त दहा गावकर व पुजारी यांनी बांधली. उद्या, मंगळवारी खंडेनवमी निमित्त पालखी सोहळा होणार आहे. सात जून नंतर बंद झालेला हा पालखी सोहळा उद्या, सुरु होणार आहे. मंदिरात शस्त्र पुजन, घट उठविणे विधी होईल.उद्या, मंगळवारी सकाळी पालखी विविधरंगी फुलांनी सजविली जाईल. त्यानंतर गुलाल, खोबऱ्याच्या उधळणीत व चांगभलंच्या जयघोषात सकाळी साडे आठ वाजता पालखी निघेल. पहाटे गावातील सुहासिनी महिला पारंपारीक पध्दतीने दिवे ओवाळणीचा कार्यक्रम करतील.जोतिबा डोंगरावर नवरात्र उत्सवास मोठे पारंपरिक महत्त्व असून याठिकाणी नवरात्र उत्सव दिमाखात साजरा केला जातो. आज सकाळी दहा वाजता मानाचा उंट, घोडा, सर्व देव सेवक यांच्या उपस्थितीमध्ये धुपारतीचा सोहळा ढोल, पिपाणी, सनई यांच्या गजरात मुळमाया श्रीयमाई मंदिराकडे गेला. यावेळी श्रीचे मुख्य पुजारी, ग्रामस्थ पुजारी, देवस्थानचे अधीक्षक दिपक म्हेत्तर उपस्थीत होते. गावातील सुवासिनी महिलांनी सडा रांगोळी काढून या सोहळ्याचे स्वागत केले. या सोहळ्यात सहभागी असणाऱ्यांना काही ग्रामस्थांनी सुगंधी दुधाचे वाटप केले. यमाई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी बारा वाजता हा सोहळा पुन्हा मुख्य मंदिरात आला. तोफेची सलामीने सोहळ्याची सांगता झाली. आज आठव्या माळेला ही डोंगरावर गर्दी कायम राहिली.
Navratri2022: आठव्या दिवशी जोतिबाची पाच पाकळी सोहन कमळ पुष्पात महापूजा, उद्या पालखी सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2022 2:08 PM