कोल्हापूर : कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या रिफायनरीमधून काढलेल्या टंचातून स्वत:च्या ३०० ग्रॅम सोन्याचे नुकसान झाल्याची तक्रार सभासद निशिकांत मेथे यांनी संघाविरुद्ध केली आहे. मात्र, प्रत्यक्षात गेल्या दोन वर्षांत त्यांनी संघाच्या रिफायनरीतून सहा टंच काढले असून, त्यातील सोने अवघे तीन ग्रॅम आहे. असे असताना ते ३०० ग्रॅम सोन्याची कशी काय मागणी करीत आहेत? त्यांनी संघावर बिनबुडाची तक्रार, आरोप केले असून, त्याच्या निषेधार्थ आज, शुक्रवारी सराफ बाजार बंद ठेवला जाणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड व सेक्रेटरी सुहास जाधव यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.संघाकडून सोन्याचे मणी व शुद्धतेचा बनावट दाखला दिल्याप्रकरणी मेथे यांनी केलेल्या तक्रारीवर खुलासा करण्यासाठी सराफ संघाच्या कार्यकारिणीने पत्रकार परिषद घेतली. यात अध्यक्ष गायकवाड म्हणाले, गेल्या १५ वर्षांपूर्वी मी अध्यक्ष असताना संघाची सोने रिफायनरी सुरू केली. या रिफायनरीतील सोने टंचाबाबत आजपर्यंत कोणत्याही सराफाची तक्रार आलेली नाही. मात्र, मेथे यांनी केलेल्या तक्रारीत संघाच्या रिफायनरीतून टंच काढलेल्या सोन्याच्या पुड्या घरामध्ये बरणीत ठेवल्या. त्यानंतर त्याचा टंच काढला असता शून्य टंच आला. गेल्या दोन वर्षांत या रिफायनरीतून काढलेल्या टंचातून स्वत:च्या ३०० ग्रॅम सोन्याचे नुकसान झाल्याचा उल्लेख केला आहे. संघाकडील रेकॉर्ड पाहता त्यांनी दोन वर्षांत सहा टंच काढले असून, त्यातील सोने अवघे तीन ग्रॅम होते. मात्र, ते ३०० ग्रॅम सोन्याची मागणी का करीत आहेत, याचा खुलासा करावा. त्यामुळे मेथे यांनी केलेली तक्रार चुकीची आहे. त्यांनी संघाच्या जुन्या व नव्या कार्यकारिणीला वेठीस धरून बदनामी केली आहे. कायदेशीर सल्ला घेऊन त्यांच्याविरुद्ध एक कोटीचा अब्रूनुकसानीचा दावा संघातर्फे दाखल केला जाणार आहे.सेक्रेटरी जाधव म्हणाले, संघाच्या बदनामीबाबत मेथे यांचे सभासदत्व रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेवला जाणार आहे. पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष राजेश राठोड, सदस्य महेंद्र ओसवाल, बिपीन परमार, सुशीलकुमार गांधी, अनिल पोतदार, नितीन ओसवाल उपस्थित होते. (प्रतिनिधी)तत्कालीन अध्यक्षांचे नाव का नाही?मेथे यांनी ज्या काळात संघाच्या रिफायनरीतून काढून घेतलेल्या टंचातून मिळालेल्या सोन्याबाबत तक्रार केली आहे, त्या कालावधीत अध्यक्षपदी रणजित परमार होते. मात्र, मेथे यांनी मंगळवारी दाखल केलेल्या तक्रारीत तत्कालीन अध्यक्ष आणि विद्यमान उपाध्यक्ष राठोड यांचे नाव का नाही, असा सवाल अध्यक्ष गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, संघाची रिफायनरी बंद आहे. इलेक्ट्रॉनिक मशीनच्या माध्यमातून तिचे अद्ययावतीकरण करून दिवाळीपर्यंत ती पुन्हा सुरू केली जाणार आहे.
मेथेंच्या निषेधार्थ आज सराफ बाजार बंद
By admin | Published: August 14, 2015 12:34 AM