कोल्हापूर : येत्या ४८ तासांत टोलवसुली सुरू करणार असल्याचे पत्र आयआरबीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना २६ मे रोजी दिले आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या विनाअट व तत्काळ संरक्षण पुरविण्याच्या आदेशानुसार पोलिसांंनी आज, बुधवारी सकाळी नऊ वाजल्यापासून बंदोबस्तही तैनात केला आहे. यामुळे दिवसभरात आयआरबीने टोलनाक्यांची डागडुजी करून टोलवसुलीची तयारी पूर्ण केल्याने मध्यरात्री किंवा उद्या, गुरुवारपासून टोलवसुली सुरू होणार आहे. सर्वाेच्च न्यायालयाने ५ मे रोजी शहरातील टोलवसुलीस उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविली. न्यायालय आदेशाच्या दुसर्या दिवसापासून आयआरबीने टोलवसुली सुरू करण्याबाबत हालचाली सुरू केल्या. पोलीस संरक्षणासाठी बंदोबस्त देण्याची मागणी पत्राद्वारे पोलीस प्रशासनास केली. दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी आयआरबीने पाठविलेल्या पत्रास उत्तर देताना, प्रथम पोलिसांसाठी शेड, शौचालय व विश्रांतीसाठी खुर्च्या, तसेच नाक्यावरील प्रत्येक कर्मचार्यांची माहिती देण्याबाबत सूचना केल्या. प्राथमिक मागण्या पूर्ण करण्याचे आयआरबीने मान्य करताच पोलीस अधीक्षकांनी २३ मे रोजी पोलीस बंदोबस्ताची तयारी पूर्ण असून, वसुलीची तारीख कळविण्याबाबत आयआरबीला पत्र लिहिले. यानंतर २६ मे रोजी दुपारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची आयआरबीचे जयंत धनागरे व नीलेश म्हेत्रे यांनी भेट घेऊन पोलीस मुख्यालयात बंदोबस्ताबाबत चर्चा केली. सर्वाेच्च न्यायालयाने शहरातील सर्व नऊ टोलनाक्यांवर विनाअट पोलीस बंदोबस्त पुरविण्याबाबत आदेश दिला आहे. तरीही आयआरबी पोलिसांसाठी शेड, शौचालय व खुर्च्या पुरवीत असल्याचे सांगितले. कर्मचार्यांची माहिती देणे अशक्य असल्याने ही माहिती देण्याबाबत आयआरबीने या बैठकीत असमर्थता दर्शविली. शहरातील सर्व नऊ टोलनाक्यांवर २८ मेपासून केव्हाही टोलवसुली सुरू करणार असून, विनाअट पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी आयआरबीने केली. यानुसार आज सकाळी नऊ वाजल्यापासून सर्व नाक्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान, पोलिसांसाठी शेड व शौचालय उभारणी तसेच नाक्यांची डागडुजी आयआरबीने सुरू केली असून, कोणत्याही क्षणी टोल सुरू होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
टोलवसुली आजपासून ! पोलिसांनी पुरविला बंदोबस्त
By admin | Published: May 29, 2014 1:26 AM