लोकमत न्यूज नेटवर्क
पन्हाळा : सूर्य हा २० मार्च रोजी बरोबर विषुववृत्तावर पोहोचत असल्याने या दिवशी संपूर्ण पृथ्वीवर सर्वत्र दिवस व रात्र सारखेच राहतील, या दिवसाला खगोलशास्त्रात विषुव दिन (इकोनॉक्स) असे म्हणतात. या दिवसाला वसंतसंपाद दिन असे सुद्धा म्हणतात. सरासरी हा दिवस दरवर्षाला २० मार्च ते २२ मार्चच्या दरम्यान असतो. पृथ्वीच्या परांचल गतीमुळे या दिवसात दरवर्षाला थोडा फरक पडतो. या दिवशी पृथ्वीचे दोन्ही ध्रुव अगदी सूर्यासमोर असतात. यावेळी विषुववृत्तावर मध्यान्हीच्या वेळी सूर्याचे किरण लंबरूप पडतात, म्हणजेच मध्यान्हवेळी विषुववृत्तावर सूर्य बरोबर डोक्यावर असतो. दिवस व रात्र नेहमीच लहान-मोठे असतात. दिवस-रात्रीची ही असमानता पृथ्वीच्या आसाच्या कलण्यामुळे निर्माण होते. जेव्हा कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो तेव्हा दोन्ही गोलार्ध सूर्यापासून समान अंतरावर असतात. अशा दिवशी संपूर्ण पृथ्वीवर दिवस-रात्र समान असतात. सर्व खगोलप्रेमींनी व जिज्ञासूंनी २० मार्चच्या दिवस व रात्रीचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा व या दिवस व रात्रीचे कालमापन करावे, असे आवाहन पन्हाळा येथील शिवाजी विद्यापीठाचे अंतराळ संशोधन विभागप्रमुख प्रा.डॉ. राजीव व्हटकर सर यांनी केले आहे. तसेच सध्या चंद्र व मंगळ हे जवळ आले असून, या दोहोंची युती पुढील चार दिवस रात्रौ ८.३० नंतर अर्धा तास सहज डोळ्यांनी दिसणार आहे, ते पाहण्याचा लाभ घ्यावा, असे प्रा.डॉ. राजीव व्हटकर यांनी सांगितले.
फोटो------- चंद्र व मंगळ ग्रह रात्रौ दिसणारा क्षण