कसबा बावडा : कसबा बावडा (ता. करवीर) येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. १९) मतदान होणार आहे. यासाठी सात तालुक्यांतील ५६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. १९ संचालक निवडीसाठी ३८ उमेदवार रिंगणात आहेत. तर १२ हजार ६२४ एकूण मतदार आहेत. दरम्यान, आज एस. टी. बस व जीपगाड्यांमधून निवडणूक केंद्रांवर मतदान साहित्य पाठविण्यात आले. ‘अ’ वर्ग उत्पादक सभासद मतदारसंघातील गट क्र. १ मध्ये इचलकरंजी, पट्टणकोडोली, हुपरी, रुई, माणगाव व रुकडी अशी सहा केंद्रे हातकणंगले तालुक्यात व गट क्र. २ मध्ये भेंडवडे, खोची, सावर्डे, वडगाव, लाटवडे, नरंदे, कुंभोज, टोप, नागाव, हेर्ले, चोकाक अशी १४ मतदान केंद्रे आहेत. गट क्र. ३ मध्ये शिये, भुयेवाडी, वडणगे, निगवे, चिखली, पोहाळे, ठाणे, यवलूज, पन्हाळा, सासने विद्यालय अशा १२ केंद्रांचा समावेश आहे. गट क्र. ४ मध्ये पुलाची शिरोली, मुडशिंगी, वसगडे, वाशी, कळंबे तर्फ ठाणे अशा गावांचा समावेश आहे. गट क्र. ५ मध्ये कसबा बावडा, उचगाव, आदी गावातील पाच मतदान केंद्रांचा सहभाग आहे. गट क्र. ६ मध्ये कांडगाव, साळवण, कडवे, कसबा तारळे, राधानगरी, धामोड अशा आठ केंद्रांचा समावेश आहे. संस्था गटात एकूण १३६ मतदार आहेत. यासाठी कारखाना कार्यस्थळावर मतदान घेण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रांवर पाच कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, एक पोलीसही तैनात करण्यात आला आहे. सात झोनल आॅफिसर असून, निवडणूक अधिकारी संजय पवार, सहा. निवडणूक अधिकारी डॉ. योगेश खरमाटे, धनंजय पाटील हे संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवत आहेत. दरम्यान, मतदान केंद्रांवर सायंकाळी साहित्य पोहोचल्यावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी बुथ लावण्यास सुरुवात केली. केंद्रावर सूचना फलक, टेबलांची मांडणी करण्यात आली. मतदान प्रक्रियेसाठी एकूण ३५० कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. त्यापैकी काही कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. (प्रतिनिधी)
‘राजाराम’च्या सत्तेच्या भवितव्याचा आज फैसला
By admin | Published: April 19, 2015 1:13 AM