कोल्हापूर : काेरोनामुळे गेल्या वर्षीपासून रखडलेल्या शाहू पुरस्काराच्या वितरणाचा निर्णय आज शुक्रवारी होणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू मेमोरियल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे.
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ट्रस्टच्यावतीने दरवर्षी शाहू पुरस्कार दिला जातो. गेल्यावर्षी तो डॉ. तात्याराव लहाने यांना जाहीर झाला होता. मात्र, कोरोनामुळे त्याचे वितरण होऊ शकले नाही. अजूनही कोरोना संसर्ग जिल्ह्यात कमी झालेला नाही; पण आता शाहू जयंती १४ दिवसांवर आल्याने या पुरस्काराचे वितरण कसे करायचे हा पेच ट्रस्टसमोर आहे. याबाबतची बातमी गुरुवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली होती. याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने आज बैठक घेतली आहे. ट्रस्टचे पदाधिकारी ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार व डॉ. अशोक चौसाळकर यांच्यासाेबत चर्चा झाल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
----
शिवसेनेचे निवेदन
‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत गुरुवारी शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी जिल्हा प्रशासनाकडे हा पुरस्कार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे किंवा डॉ. तात्याराव लहाने यांच्या घरी जाऊन त्यांना पुरस्कार दिला जावा, अशी मागणी केली आहे. तसेच यावर्षीचा शाहू पुरस्कार शाहू जयंतीला जाहीर करावा, असेही निवेदनात म्हटले आहे.
---