कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर झाल्याने सत्तारूढ गटाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शनिवारी सायंकाळी आमदार हसन मुश्रीफ, माजी मंत्री विनय कोरे, माजी राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर, आदी नेत्यांशी सत्तारूढ गटाने चर्चा करून त्यांचा कल जाणून घेतला आहे. आज, रविवारी दुपारी ते पॅनेलची घोषणा करणार आहेत. शेतकरी संघाच्या १९ जागांसाठी अद्याप १३९ अर्ज शिल्लक आहेत. सत्तारूढ गटाने सुरुवातीला सर्व इच्छुकांच्या गाठीभेटी घेत निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. बिनविरोधची शक्यता धूसर बनल्याने गेले दोन दिवस त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस, जनसुराज्य, कॉँग्रेसच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत पॅनेल बांधणीच्या हालचाली गतिमान केल्या. शनिवारी सायंकाळी सत्तारूढ गटाचे नेते संघाचे अध्यक्ष वसंतराव मोहिते, शोभा नेसरीकर, आदींनी शासकीय विश्रामगृह येथे जाऊन आमदार हसन मुश्रीफ, माजी खासदार निवेदिता माने, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार नरसिंग पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याशी चर्चा केली. इच्छुकांनी आपल्या नेत्यांमार्फत सत्तारूढ गटात संधी मिळावी, यासाठी मोर्चेबांधणी केली होती. बैठकीनंतर आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, सत्तारूढ गटाने आमच्याशी चर्चा केली. विरोधी गटाबरोबर उद्या चर्चा करून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा बॅँक, बाजार समितीपेक्षा ही निवडणूक वेगळी आहे. शेतकरी संघ हा आशिया खंडातील नावाजलेला संघ असल्याने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे माजी मंत्री विनय कोरे यांनी सांगितले.
‘सत्तारूढ’च्या पॅनेलची आज घोेषणा
By admin | Published: September 13, 2015 12:37 AM