कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या ४२व्या महापौरपदी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या अश्विनी रामाणे, तर उपमहापौरपदी शमा मुल्ला यांची निवड निश्चित मानली जाते; पण आवश्यक संख्याबळापर्यंत पोहोचण्यासाठी काही मोजक्याच मतांची गरज असल्याने भाजप-ताराराणी आघाडी महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक लढविण्यास सज्ज झाली आहे. शिवसेनाही भाजप-ताराराणी आघाडीसोबत राहण्याबाबतचा निर्णय सभागृहातच जाहीर करणार आहे. दरम्यान, नगरसेवक फुटीचा धोका पत्करावा लागू नये म्हणून खबरदारी घेऊन शनिवारी (दि. १४) सायंकाळी सहलीवर गेलेले काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे ४४ नगरसेवक आज, सोमवारी सकाळी कोल्हापुरात पोहोचतील. त्यानंतर सकाळी ११ वाजता महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात या निवडी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत.नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसला २७, राष्ट्रवादीला १५, ताराराणीला १९, भाजपला १३, शिवसेनेला चार जागा मिळाल्या, तर तीन जागांवर अपक्षांना संधी मिळाली. त्यामुळे कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली गतिमान केल्या होत्या. त्यांना तीनपैकी दोन अपक्ष नगरसेवकांनी पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे संख्याबळ ४४ पर्यंत पोहोचले आहे. काँग्रेसकडून महापौरपदासाठी अश्विनी रामाणे, तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या शमा मुल्ला यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत; पण आवश्यक संख्याबळापर्यंत(पान १ वरुन) पोहोचण्यासाठी मोजक्याच जागांची आवश्यकता असल्याने भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी चमत्कार घडविण्याची भाषा केली होती; पण राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडून स्पष्ट दुजोरा मिळाला नसल्याने विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय घेतल्याचे चंद्रकांतदादा यांनी जाहीर केला. तथापि, तरीही त्यांनी निवडणूक भाजप-ताराराणी महायुतीद्वारे लढविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपतर्फे महापौरपदासाठी भाजपच्या सविता भालकर, तर उपमहापौरपदासाठी ताराराणीचे राजसिंह शेळके हे निवडणूक लढविणार आहेत. याशिवाय ताराराणीकडून महापौरपदासाठी स्मिता माने, तर भाजपकडून उपमहापौरपदासाठीचा संतोष गायकवाड यांचा अर्ज आज, सोमवारी सभागृहातच मागे घेण्यात येणार आहेत.विरोधी बाकावर बसण्याची भूमिका चंद्रकांतदादा यांनी घेतली असली तरीही या निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाही भाजप-ताराराणी आघाडीच्या नेत्यांनी आपलाच महापौर होण्यासाठी पुन्हा हालचाली केल्या. दरम्यान, भाजप-ताराराणी आघाडीच्यावतीने दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेतलेले नाहीत. त्यामुळे खबरदारी म्हणून कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी शनिवारी सायंकाळी आपल्या आघाडीच्या ४४ नगरसेवकांना कऱ्हाड येथे एका हॉटेलवर नेऊन ठेवले होते. रविवारी दिवसभर कोयना जलाशय पाहणीनंतर सर्व नगरसेवकांचा ताफा पुन्हा सायंकाळी कऱ्हाडमध्ये हॉटेलवर परतला. रात्री उशिरा त्यांची माजी मंत्री सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांनी भेट घेऊन मार्गदर्शन केले. दरम्यान, रविवारी रात्री पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजप-ताराराणी आघाडीच्या सर्व ३२ व १ अपक्ष नगरसेवकांची कोल्हापुरात एका हॉटेलवर बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी त्यांना मार्गदर्शन केले. शिवसेनेनेही भाजप-ताराराणीसोबत जायचे की स्वतंत्र गट म्हणून अस्तित्व ठेवायचे, याचा निर्णय प्रलंबित ठेवला आहे. महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने महानगरपालिका परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शहर पोलीस उपाधीक्षक भारतकुमार राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पोलीस निरीक्षक, ३०० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. (प्रतिनिधी)काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक ‘अजिंक्यतारा’वरून निघणारसहलीला बाहेरगावी नेलेले सर्व ४४ नगरसेवक सकाळी ८ वाजता कोल्हापुरात ‘अजिंक्यतारा’ येथे दाखल होणार असून, तेथून सकाळी साडेनऊ वाजता महापालिकेत एकत्रित येणार आहेत. त्यांच्यासोबत माजी मंत्री सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, प्रा. जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आर. के. पोवार हे महापालिकेत येणार आहेत.शिवसेनेचा निर्णय आज सभागृहातमहापालिकेमध्ये महापौरपदासाठी भाजप-ताराराणी आघाडीला पाठिंबा द्यायचा की स्वतंत्र अस्तित्व ठेवायचे, हा निर्णय शिवसेना आज, सोमवारी सकाळी ११ वाजता थेट सभागृहात घेईल, असे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी रविवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महापालिकेत शिवसेनेचा गटनेता म्हणून नियाज खान यांची निवड केल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.दिंडोर्ले यांचा ‘भाजप-ताराराणी’ला पाठिंबाअपक्ष नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी भाजप-ताराराणी आघाडीला पाठिंबा दिल्याचे सुनील मोदी यांनी जाहीर केले. पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा आमदार अमल महाडिक व ताराराणी आघाडीचे अध्यक्ष स्वरूप महाडिक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सुनील कदम, महेश जाधव, आदी उपस्थित होेते.
महापौरपदासाठी आज निवडणूक
By admin | Published: November 16, 2015 1:15 AM