कोल्हापूर : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर गावोगावी आज आयोजित केलेली गावसभा ही ग्रामसेवकांशिवाय घ्यावी लागणार आहे. औरंगाबाद व जत येथील मारहाणीचा निषेध म्हणून ग्रामसेवक आक्रमक झाले असून सरकारला सरकारी कर्मचाऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी गावसभेला हजर न राहण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेत सिंचन कामाच्या वाटपावरून ८ आॅगस्टला जिल्हा परिषद सदस्य संभाजी डोणगांवकर यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांना बेदम मारहाण केली होती. त्याचबरोबर मोरषगी (ता. जत) येथील ग्रामसेवक अशोक बिराजदार यांच्यावर शिवानंद बगली यांनी प्राणघातक तलवार हल्ला केला होता. या घटनांचा निषेध करत ११ आॅगस्टला जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते. दोन्ही घटना होऊन आठ-दहा दिवस झाले तरी संबंधितांवर कारवाई झालेली नाही. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हेच जर सुरक्षित नसतील तर ग्रामसेवकांचे काय? ग्रामपंचायत पातळीवर कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अधिकाऱ्यांशिवाय ग्रामसेवकांना काम करावे लागत आहे. त्यामुळे अनेकवेळा चुकीची कामे करण्यासाठी राजकीय दबाव टाकला जातो. त्यामुळे वादंग निर्माण होतो, पण सरकार कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहत नसल्याचा आरोप संघटनांकडून होत आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज, स्वातंत्र्यदिनानिमित्त गावोगावी होणाऱ्या गावसभेला ग्रामसेवक गैरहजर राहणार आहेत. सकाळी ध्वजारोहणासाठी ते हजर राहणार पण सभेला अनुपस्थित राहण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच ग्रामसेवकांशिवाय गावसभा घ्याव्या लागणार आहेत. मुख्याध्यापक सचिव ग्रामसेवक हे सभेचे सचिव असल्याने त्यांच्या स्वाक्षरीनेच सभेतील ठराव, धोरणात्मक निर्णयाला अंतिम मंजुरी मिळते; पण ग्रामसेवक गैरहजर राहणार असल्याने सभेसाठी काही गावांत सरपंचांनी मुख्याध्यापकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. गावसभेला ग्रामपंचायत अधिनियम ७ (११) नुसार सचिवांची नेमणूक करावी लागते. सभेला महत्त्वाचे विषय असल्याने ग्रामसेवकांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे. जे ग्रामसेवक गैरहजर राहतील त्यांच्यावर कारवाई होईल. - एम. एस. घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत),
ग्रामसेवकांशिवाय आजची गावसभा
By admin | Published: August 15, 2016 12:59 AM