कोल्हापूर : समाजोद्धारक, रयतेचा राजा राजर्षी शाहू महाराजांना जयंतीनिमित्त आज, मंगळवारी अभिवादन करण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले आहेत. शाहू जन्मस्थळ येथे अभिवादन, दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन, व्याख्याने, शाहूंच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या मिरवणुका, गल्लोगल्ली, पेठांद्वारे सुरू असलेल्या जंगी तयारीने यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच शाहू जयंतीला लोकोत्सवाचे स्वरूप आले आहे. यानिमित्ताने शाहूंचे विचार जगभर पोहोचणार आहेत.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज म्हणजे देशाला समतेचा विचार देणारे दूरदृष्टी असलेले द्रष्टेराजे. या लाडक्या राजाला जयंतीदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी सकाळी कसबा बावड्यातील शाहू जन्मस्थळ येथे सकाळी आठ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शाहू महाराजांना अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर राजर्षी शाहूंच्या छायाचित्राचे प्रकाशन होणार आहे. यावेळी शहरातील सर्व लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी उपस्थित असतील. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने शाहू स्मारक भवनात सायंकाळी सहा वाजता प्रा. पुष्पा भावे यांना राजर्षी शाहू पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
यावेळी शाहू छत्रपती, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे उपस्थित असतील.लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सव समितीच्यावतीने दुपारी साडेचार वाजता मिरजकर तिकटी मंगळवार पेठ येथून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते, शाहू छत्रपती, महापौर शोभा बोंद्रे यांच्यासह खासदार आमदारांसह लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत या मिरवणुकीचा शुभारंभ होईल. लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठानच्यावतीने दुपारी चार वाजता खासबाग मैदान येथून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यात पारंपरिक मर्दानी खेळ, ढोलपथक, घोडे, बग्गी, महापुरुषांच्या वेशभूषा यांचे खास आकर्षण असेल.
अखिल भारतीय मराठा महासंघ व मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्यावतीने शाहू स्मारक भवन कलादालन येथे शाहू महाराजांच्या दुर्मीळ छायाचित्रांचे, त्यांनी केलेले ठराव यांचे प्रदर्शन सुरू आहे.
सत्यशोधक समाजाच्यावतीने जयंतीकोल्हापूर : शाहू सत्यशोधक समाज, कोल्हापूर यांच्यावतीने आज प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण यांचे ‘राजर्षी शाहू व सत्यशोधक समाज’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. सायंकाळी पाच वाजता माजी आमदार संपतराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
शाहू पुरस्काराला आवर्जून या !कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू स्मारक ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या मानाच्या ‘शाहू पुरस्कारा’चे वितरण आज, मंगळवारी ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांना करण्यात येत आहे. या सोहळ्यास समाजातील सर्वच स्तरांतील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे. सायंकाळी सहा वाजता हा समारंभ शाहू स्मारक भवनात आहे; परंतु मागच्या काही पुरस्कार सोहळ्याचा अनुभव असा आहे की त्यास कोल्हापुरातील लोकप्रतिनिधीच फारसे उपस्थित नसतात. रोज सकाळ-दुपार शाहूंचा गजर करणारे शाहूंच्या कार्याला अभिवादन करण्यात येणाºया सोहळ्यास मात्र दांडी मारतात. आम्हाला या समारंभाची निमंत्रण पत्रिका दिली जात नाही, अशीही तक्रार गेल्यावर्षी काही आमदार-खासदारांनी केली होती; परंतु निमंत्रण पत्रिका कुणी कुणाला द्यायची, हाच प्रश्न आहे. हा समारंभच शाहू जयंतीचा आहे म्हणजे तो माझा आहे व पुरस्कार सोहळ्यास जाणे हे माझी जबाबदारी आहे, अशा भावनेतून लोकप्रतिनिधींसह सर्वांनीच या सोहळ््यास उपस्थित राहून शाहूंना मानवंदना दिली पाहिजे.