शिरोळ : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खर्चावर आधारित उसाचा दर मिळाला पाहिजे, मागील ऊस दरातील ३०० रुपये घेतल्याशिवाय व चालू वर्षीच्या गळीत हंगामातील दर निश्चित झाल्याशिवाय साखर कारखाने चालू करू देणार नाही, या मागण्यांसाठी आज, शनिवारी सायंकाळी ५ वाजता शिरोळ येथील शिवाजी चौकात सकल ऊसकरी परिषद होत आहे. या परिषदेची तयारी पूर्ण झाली आहे. २ नोव्हेंबरला कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत मागील वर्षीचा अंतिम दर देण्याआधीच यावर्षीची पहिली उचल कशी काय ठरविता, असा मुद्दा उपस्थित करून सकल ऊसकरी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक सोडून आंदोलनाचा निर्णय घेतला होता. १४ दिवसांत ‘एफआरपी’ची रक्कम देणे कायद्याने बंधनकारक असताना सरकार कायदा मोडत आहे. चार वर्षांपासून शेतकऱ्यांची फसवणूक शासन व कारखानदार करीत आहेत. त्यामुळे ‘एफआरपी’ हा मुद्दा मान्य नसल्याची भूमिका कार्यकर्त्यांची आहे. चालू गळीत हंगामातील उसाला दर किती असेल? मागील ऊस बिलाचा हिशेब शासनाने चुकता केला पाहिजे, याबाबत आजच्या ऊसकरी परिषदेमध्ये धोरण ठरणार आहे. बंटी देसाई, दादा काळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी तालुक्यात ठिकठिकाणी बैठका घेऊन जनजागृती केली आहे. या ऊस परिषदेत आंदोलनाची दिशा ठरविली जाणार असली तरी ७ नोव्हेंबरला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याची घोषणा यापूर्वीच सकल ऊसकरी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)ऊसकरी परिषदेकडे लक्षकोल्हापूर येथे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ‘एफआरपी’ अधिक १७५ रुपये असा ऊसदराचा तोडगा निघाला होता. हा तोडगा मान्य नसल्याचे सांगून शिरोळच्या सकल ऊसकरी परिषदेने आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला होता. शुक्रवारी पंचगंगा व जवाहर साखर कारखान्यांच्या ऊसतोडी बंद पाडून यंदाच्या हंगामातील पहिले आंदोलन सकल ऊसकरी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी फुंकले आहे. त्यामुळे आजच्या परिषदेत कोणता निर्णय होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
शिरोळमध्ये आज सकल ऊसकरी परिषद
By admin | Published: November 05, 2016 12:39 AM