कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याने केलेल्या गौप्यस्फोटाचा चौकशी अहवाल तपास अधिकारी व अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या. आज, शनिवारी न्यायालयास सादर करतील. त्याचबरोबर गायकवाडच्या न्यायालयीन कोठडीची मुदतही संपत असल्याने त्यावर सुनावणी होणार आहे. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित गायकवाड याला दि. १६ सप्टेंबरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. त्याने न्यायालयीन कोठडीत असताना व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये त्याने गौप्यस्फोट केला. त्यामध्ये त्याने पोलिसांनी ९ आॅक्टोबरला ब्रेन मॅपिंग सुनावणीसाठी कसबा बावडा येथील न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी पायऱ्या चढताना एक अनोळखी पोलीस माझ्याजवळ आला. त्याने माझ्या कानात मी पोलीस असून साहेबांचा तुझ्यासाठी निरोप आहे. ‘सामाजिक संघटनांचा पोलिसांवर दबाव आहे. अन्य साक्षीदारांची नावे सांग, ब्रेन मॅपिंग चाचणीसाठी हो म्हण, त्यासाठी तुला माफीचा साक्षीदार बनवून २५ लाख रुपये देतो. नाही म्हटलास तर तुला फासावर लटकाविण्याची तयारी आम्ही केली आहे,’ अशी धमकी दिल्याची धक्कादायक माहिती दिली होती. त्यानुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. यादव यांनी तपास अधिकारी एस. चैतन्या. यांना समीरने केलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करून ५ डिसेंबरपर्यंत न्यायालयास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी गोपनीय पातळीवर समीरच्या गौप्यस्फोटाची चौकशी सुरू केली होती. त्याच्या अवती-भोवती असणाऱ्या अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांकडे चौकशी करून त्यांचे जबाब घेतले आहेत. समीरला कारागृहात कोण भेटले, याचीही माहिती पोलिसांनी घेतली असून गोपनीय अहवाल आज न्यायालयास सादर केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
समीरच्या गौप्यस्फोटाचा आज चौकशी अहवाल
By admin | Published: December 05, 2015 12:58 AM