कोल्हापूर : सर्किटबेंचच्या मागणीसाठी आणि माजी मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांच्या निषेधार्थ आज, गुरुवारी पुकारण्यात आलेला बंद यशस्वी करण्याचा निर्धार खंडपीठ कृती समितीच्यावतीने आयोजित ठिय्या आंदोलनावेळी करण्यात आला. या बंदला सर्वपक्षीय संघटनांनी एकमुखाने पाठिंबा जाहीर केला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवून आजच्या महारॅलीत सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी मंगळवारी कोल्हापुरात ‘सर्किट बेंच’ स्थापन करण्याबाबत निर्णय न घेता सेवानिवृत्ती घेतली. त्यामुळे गेल्या ३० वर्षांपासून सुरू असलेल्या ‘सर्किट बेंच’चा प्रश्न पुन्हा प्रलंबित राहिला. याच्या निषेधार्थ वकिलांनी काल मोहित शहा यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून त्यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांत बुधवारपासून तीन दिवस न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा आणि गुरुवारी कोल्हापूर बंद पुकरण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार बुधवारी सहाही जिल्ह्यांतील वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला त्यामुळे सुमारे आठ हजार खटल्यांचे कामकाज ठप्प झाले. कोल्हापुरातही न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून वकिलांनी कृती समितीच्या नेतृत्वाखाली वकिलांनी जिल्हा न्यायालयासमोर उभारण्यात आलेल्या शामियान्यात सर्व वकिलांनी बुधवारी सकाळी एकत्र येऊन निषेध केला. त्यानंतर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी महापौर वैशाली डकरे, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते दिलीप पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने, टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे, नगरसेवक राजेश लाटकर, शारंगधर देशमुख, बाबा इंदुलकर, शिवसेना शहराध्यक्ष दुर्गेश लिंग्रस, मनसे वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव, माजी महापौर सुनील कदम, हॉटेलमालक संघाचे जगदाळे, शेतकरी संघटनेचे पी. जी. पाटील, सिटिझन फोरमचे प्रसाद पाटील, प्रजासत्ताक संघटनेचे दिलीप देसाई, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर, हिंदू एकताचे चंद्रकांत बराले, स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष व्ही. डी. माने, सुंदरराव देसाई, आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन रॅलीत सहभागी होण्याची ग्वाही दिली. आंदोलनाचे नियोजन समितीचे निमंत्रक राजेंद्र चव्हाण, अॅड. प्रशांत चिटणीस, रवींद्र जानकर, शिवाजीराव राणे, अजित मोहिते, माणिक मुळीक, धनंजय पठाडे, आदींनी केले. १५ हजार विद्यार्थी होणार सहभागी खंडपीठ कृती समितीने आज, गुरुवारी ‘कोल्हापूर बंद’ पुकारला आहे. त्याला बुधवारी सर्वपक्षियांनी एकमुखाने पाठिंबा जाहीर केला. जिल्हा न्यायालय येथून सकाळी अकरा वाजता महारॅली काढण्यात येणार आहे. त्यामध्ये लोकप्रतिनिधींसह राजकीय-सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वाहतूक संघटनांसह शाळा-महाविद्यालये बंद ठेवून १५ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत.
सर्किट बेंचसाठी आज महारॅली
By admin | Published: September 10, 2015 1:25 AM