कोल्हापूर : शहरातील एकात्मिक रस्तेविकास प्रकल्पाची काल, गुरुवारी तज्ज्ञांच्या समितीने पाहणी केली. टोलबाबत अंतिम लढ्याची वेळ आली असून, पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी उद्या, शनिवारी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीची बैठक मिरजकर तिकटी येथे होणार आहे. सायंक ाळी चार वाजता होणाऱ्या या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.राज्य सरकारने नियुक्त केलेल्या तज्ज्ञांच्या समितीतील राजीव श्रीखंडे व उदय खैराटकर यांनी गुरुवारी शहरास भेट देऊन रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. या समिती सदस्यांना रस्तेविकास महामंडळाचे उपअभियंता नरेंद्र भांबुरे व देवेंद्र सरोदे यांनी मदत केली. मंडळाने यापूर्वीच तीन आठवडे खात्यातील अभियंत्यांमार्फत रस्त्याचे सर्वेक्षण केले आहे. समिती सदस्यांचा सर्वेक्षण अहवाल व प्रत्यक्ष पाहणी यांचा मेळ घालून प्रकल्पाचे नेमके मूल्यांकन व करारातील अटी-शर्ती यांतील तफावत यांचा मेळ घालणार आहेत.मूल्यांकनाचा अहवाल राज्य सरकारकडे दिल्यानंतर शासनस्तरावर टोलबाबत निर्णय होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी राज्य शासनाने ‘टोल रद्द’ची अधिसूचना काढावी, यासाठी कृती समितीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाची पुढील दिशा या बैठकीत ठरविली जाणार आहे. (प्रतिनिधी)
टोलविरोधी कृती समितीची आज बैठक
By admin | Published: July 26, 2014 12:03 AM