कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) गुरुवारी (दि. २३) मतदान होत आहे. सेंट झेव्हियर्स हायस्कूल, ताराबाई पार्क कोल्हापूर येथे सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान होणार असून यंत्रणा सज्ज झाली आहे. ठरावधारकांना गठ्ठ्याने आणले जाणार असल्याने मतदानासाठी गर्दी उसळणार आहे, त्यामुळे केंद्रातील मतदान बूथची संख्या वाढवण्यात आली आहे. ‘गोकुळ’साठी ३२४८ ठरावधारक मतदानास पात्र आहेत. गेले पंधरा-वीस दिवस काही ठरावधारकांना सहलीवर पाठविण्यात आले आहे. दक्षिण भारताच्या सहलीवर पाठविलेले ठरावधारक बुधवारी दुपारी सौंदत्ती येथे दाखल झाले. त्यानंतर रात्री बेळगाव येथे त्यांना आणले असून सकाळी आठपासून एकत्रितपणे मतदान केंद्रांवर आणले जाणार आहे. विरोधी गटाने ड्रीम वर्ल्ड येथे ठरावधारकांची सोय केली असून तेथून ते शक्तिप्रदर्शनाने मतदान केंद्रांवर येणार असल्याने मतदानासाठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. दहा केंद्रांवर मतदान होणार असले तरी एका केंद्रातील बूथची संख्या वाढविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)उद्या अकरालाच गुलाल!शुक्रवारी (दि. २४) सकाळी आठ वाजल्यापासून सिंचन भवन येथील निवडणूक कार्यालयात मतमोजणी करण्यात येणार आहे. सर्वसाधारण गटातील मोजणी १५ टेबलांवर तर राखीव गटातील चार टेबलांवर करण्यात येणार आहे. त्यामुळे मतपत्रिकेचे एकत्रीकरण झाले की तासाभरात निकाल लागणार आहे. साधारणत: सकाळी अकरालाच गुलाल उधळला जाणार आहे.
‘गोकुळ’साठी आज मतदान
By admin | Published: April 23, 2015 1:08 AM