कोल्हापूर : जिल्ह्यातील खासगी संस्थांतील बालवाडी शिक्षिका व सेविका आज, शनिवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नाळे कॉलनी येथील घरावर मोर्चा काढणार आहेत. गेले पाच दिवस आमरण उपोषणाला बसलेल्या बालवाडी शिक्षिकांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार आहे. आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बालवाडी शिक्षिका व सेविका २३ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसल्या आहेत. गेल्या पाच दिवसांत कोणीही त्यांची दखल घेतलेली नाही, की त्यांच्याशी चर्चा केलेली नाही. उपोषणास बसलेल्या सोळा शिक्षिकांची प्रकृती बिघडल्यामुळे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते; पण शुक्रवारी सर्व शिक्षिकांनी डिस्चार्ज घेऊन पुन्हा उपोषणास सुरुवात केली आहे. शुक्रवारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने उपोषणास बसलेल्या शिक्षिकांची वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळी अंजनी नवाळे, आशा कोटी व सुशीला कोसुगडे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याचे आढळून आले. गेल्या काही दिवसांपासून त्यांना हा त्रास सुरू आहे. उपोषणाचा पाचवा दिवस असल्याने अनेक शिक्षिकांना अशक्तपणा आला आहे. आज, शनिवारी सकाळी अकरा वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय शिक्षिकांनी घेतला आहे. संभाजीनगर बसस्थानकावरून या मोर्चाची सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)
बालवाडी शिक्षिकांचा आज पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा
By admin | Published: March 27, 2015 10:42 PM