लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आज, बुधवारी मुंबईत राज्यातील ११४ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ‘कागल’, ‘चंदगड’ व ‘राधानगरी’ मतदारसंघांतील राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन आगामी निवडणुकीबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार हे सूचना करणार आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सत्तेत येऊन पावणेदोन वर्षाचा कालावधी संपला आहे. २०१४ पूर्वी पंधरा वर्षे पक्ष सत्तेत होता, त्यावेळी पक्षाच्यावतीने पक्षबांधणीबाबत फारसे गांभीर्याने घेतले नव्हते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पक्षाची सत्तेची सूज कमी झाल्यानंतर खरे अस्तित्व समोर आले. त्यामुळे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी संघटनात्मक बांधणीकडे अधिक लक्ष दिले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विविध सेलच्या माध्यमातून पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. संघटनात्मक बांधणी करत असताना पक्षाने २०२४ डोळ्यासमोर ठेवून राज्यात विधानसभा मतदारसंघाची बांधणीही सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज, पक्षाध्यक्ष शरद पवार हे २०१९ ला पक्षाने लढविलेल्या ११४ मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात २०१९ पक्षाने ‘कागल’, ‘चंदगड’ व ‘राधानगरी’ हे तीन मतदारसंघ लढविले होते. त्यापैकी दाेन ठिकाणी यश मिळाले. या तिन्ही मतदारसंघांतील ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील व माजी आमदार के. पी. पाटील हे आढावा बैठकीला उपस्थित राहणार आहेत.