कोल्हापूर : बालशिक्षण हे एकूण शिक्षणाचा, जीवनाचा पाया आहे. त्यामुळे हे शिक्षण शास्त्रीय, दर्जेदार व सार्वत्रिक झाले पाहिजे यासाठी महाराष्ट्र बालशिक्षण परिषद कार्यरत आहे. याअंतर्गत परिषदेने ‘रचनावादी बालशिक्षण’ या विषयावर २२ वे राज्यस्तरीय अधिवेशन कोल्हापुरात आयोजित केले आहे. या तीनदिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन आज, सोमवारी सकाळी अकरा वाजता राम गणेश गडकरी सभागृहात काडसिद्धेश्वर स्वामी, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथ्था यांच्या हस्ते होणार आहे. अधिवेशनात यावर्षी ‘रचनावादी बालशिक्षण’ विषयावर विचारमंथन होणार आहे.यावर्षीच्या अधिवेशनात ‘रचनावादी बालशिक्षण’ या विषयावर चर्चा, तसेच शोधनिबंध सादर होतील. अधिवेशनाच्या अध्यक्षपदी अलका बियाणी, तर स्वागताध्यक्ष भालचंद्र पाटील आहेत. अधिवेशनात ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया, सृजन आनंद विद्यामंदिरच्या संचालिका सुचेता पडळकर, किरण विद्या विहारच्या संस्थापिका जयश्री चव्हाण यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना बालशिक्षण परिषदेतर्फे मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे. शिवाय ‘रचनावादी बालशिक्षण’ संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. १८) दुपारी दोन वाजता अधिवेशनाचा समारोप होणार आहे. दरम्यान, रविवारी सकाळपासून अधिवेशनासाठी शिक्षक, प्रतिनिधी येऊ लागले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुमारे आठशे जणांनी नावनोंदणी केली. यात कोल्हापूरसह पुणे, मुंबई, परभणी, ठाणे, गोवा, सांगली, आदी परिसरातील शिक्षकांचा समावेश होता.शिक्षक दिंडी आज;तज्ज्ञांचे मार्गदर्शनया अधिवेशनाच्या उद्घाटनापूर्वी आज, सोमवारी सकाळी आठ वाजता बिंदू चौकातून शिक्षक दिंडी काढण्यात येणार आहे. बिंदू चौक, शिवाजी चौक, भवानी मंडप ते राम गणेश गडकरी सभागृह असा दिंडीचा मार्ग आहे. अधिवेशनात शिक्षणतज्ज्ञ प्रा. रमेश पानसे, सुषमा पाध्ये, अदिती नातू, प्रतिभा भराडे, रजनी दाते, संजय पाटील, वर्षा कुलकर्णी, अजित पाटील, आदी मार्गदर्शन करणार आहेत. अधिवेशनाचे उद्घाटन आज, सोमवारी पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलनाने करण्याला बगल देऊन रिमोट कंट्रोलद्वारे ‘रचनावादी बालशिक्षण’ या विषयावरील चित्रफितीचा प्रारंभ करून केले जाणार आहे. अधिवेशनात फ्रेडरिक फ्रोबेलचे बालशिक्षण, माँटेसरीचे रचनावादी बालशिक्षण, भारतीय बालशिक्षण व रचनावाद, बालशिक्षणात रचनावादी शिक्षण उपक्रम, आदींवर चर्चा होणार आहे. अधिवेशनात सुमारे दीड हजार प्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक सहभागी होणार आहेत. अधिवेशनातील चर्चा व ठराव शासनाला सादर केले जातील.- राजगोंडा वळिवडे, संयोजक, राज्यस्तरीय अधिवेशन
‘रचनावादी बालशिक्षण’वर आजपासून विचारमंथन
By admin | Published: November 16, 2015 12:24 AM