कोल्हापूर : ‘भरतनाट्यम्’च्या विश्वविक्रमानंतर ‘लावणी मानवंदना’ हा १२ मिनिटे ४६ सेकंदांचा विश्वविक्रमी कार्यक्रम आज, रविवारी सायंकाळी पाच वाजता शिवाजी स्टेडियम येथे होत आहे. नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील यांच्यासह सहाशेवर कलाकार यात सहभागी होणार आहेत. याप्रसंगी ज्येष्ठ लावणी कलाकार गुलाबबाई संगमनेरकर यांना तपस्यासिद्धी कला अकादमीतर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच लावणी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मंगला साखरे-विधाते, राजश्री नगरकर, रेश्मा मुसळे-परितेकर यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सर्व कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती संस्थेच्या सचिव शोभा पाटील यांनी शनिवारी पत्रक ार परिषदेत दिली. यावेळी सिनेनृत्यदिग्दर्शिका हेमसुवर्णा मिरजकर, उद्योजक अमोल कोरगावकर उपस्थित होते. या कार्यक्रमाला महापौर अश्विनी रामाणे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हा परिषदेच्या सदस्या शौमिका महाडिक, लेखक विश्वास पाटील, आदी उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमास करवीरकर जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजिका शोभा पाटील यांनी केले आहे. प्रवेश व्यवस्था रावणेश्वर मंदिरासमोरच्या प्रवेशद्वारातून प्रमुखपाहुणे, सहभागी कलाकार, स्वयंसेवक, निमंत्रितांना; तर प्रेक्षकांना गेट क्रमांक १, २, ३ व ४ मधून प्रवेश देण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)
आज विश्वविक्रमी ‘लावणी मानवंदना’
By admin | Published: January 31, 2016 1:16 AM