कोल्हापूर : कन्नडमधील ज्येष्ठ पुरोगामी साहित्यिक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा छडा लावावा, या मागणीसाठी कलबुर्गी, डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांचे कुटुंबीय एकत्रिपणे येत्या मंगळवारी (दि. १५) कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना भेटून तपासाबाबत विचारणा करणार आहेत. बंगळूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दालनात दुपारी एक वाजता त्यांच्याकडून भेटीची वेळ दिल्याचे पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे म्हणाल्या. गेल्या रविवारी त्यांनी धारवाड येथे कलबुर्गी कुटुंबीयांची भेट घेतली. तिथे विश्वनाथ स्वामी (चेन्नई), कर्नाटक स्त्री साहित्यिक संघाच्या अध्यक्ष डॉ. वसुंधरा भूपती, कन्नड कवयित्री, डॉ. हेमा पट्टणशेट्टी, प्रा. शशीधर तोडकर, शंकर हलगत्ती, आदींनी डॉ. कलबुर्गी यांच्या पत्नी उमादेवी, मुलगा श्रीविजय यांचे सांत्वन केले. शिष्टमंडळात मेघा पानसरे, हमीद दाभोलकर, ‘अंनिस’चे राज्य अध्यक्ष अविनाश पाटील, कलबुर्गी यांचे कुटुंबीय तसेच कन्नड साहित्यिक व विवेकवाद्यांचा समावेश असेल.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी मंगळवारी एकत्र चर्चा
By admin | Published: September 11, 2015 12:58 AM