कोल्हापूर : शहरातील सर्व स्वच्छतागृहांचे सर्वेक्षण करून एक महिन्यात त्याची योग्य ती डागडुजी करण्यासह काही ठिकाणी नवीन स्वच्छतागृहे उभारली जातील, अशी ग्वाही महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळास दिली.
कोल्हापूर शहरात सर्वच ठिकाणी महिला व पुरुषांच्या सार्वजनिक स्वच्छतागृहे रातोरात गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. मुळातच स्वच्छतागृहांची संख्या कमी असल्यामुळे नागरिकांच्या विशेषतः महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न घेऊन कृती समितीचे शिष्टमंडळ बलकवडे यांना बुधवारी भेटले तसेच त्यांना निवेदन देऊन चर्चा केली.
महापालिका प्रशासन स्वच्छता सर्वेक्षणावर लाखो रुपयांचा खर्च करत आहेत आणि त्याच्या प्रचाराच्या फलकांखालीच नागरिक उघड्यावर लघुशंका करतात याला जबाबदार
महापालिकाच आहे. कारण ठरावीक अंतरावर स्वच्छतागृहे नाहीत त्याला नागरिकांचा काहीच दोष नाही. सोन्या मारुती चौक, दसरा चौक मार्गे दाभोळकर कॉर्नर, ताराराणी चौक, रुईकर कॉलनी ते शहराबाहेर पडणाऱ्या तावडे हॉटेल कमानीपर्यंत, दसरा चौक ते मिरजकर तिकटी मार्गे नंगीवली चौक ते सिद्धाळा गार्डन, पद्माराजे हायस्कूल ते महाद्वार रोड मागे पापाची तिकटी कुंभार गल्ली, बुरुड गल्ली, अंबाबाई मंदिर ते रंकाळा चौपाटी अशा वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छतागृहे नाहीत याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.
प्रशासकांना भेटलेल्या शिष्टमंडळात अशोक पोवार, रमेश मोरे, चंद्रकांत सूर्यवंशी, लहुजी शिंदे, महादेव जाधव, किशोर घाडगे, सी. एम. गायकवाड, भाऊ घोडके, गीता हसुरकर, पूजा पाटील, छाया जाधव, सुवर्णा मिठारी, लता जगताप, संभाजी जगदाळे, राजू मालेकर, दुर्गेश लिंग्रस, श्रीकांत भोसले, महादेव जाधव यांचा समावेश होता.