कोल्हापूर : शहरातील एकही घर शौचालयापासून वंचित राहणार नाही यासाठी ‘एक घर, एक शौचालय’ योजनेतून जास्तीत जास्त लाभ देण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी येथे केली. एक घर, एक शौचालय योजनेंतर्गत शेल्टर असोसिएशन संस्थेने ५६६ शौचालयांची उभारणी केली आहे. उर्वरित शौचालये लवकरच बांधण्यात येतील, असे सांगून नागरिकांनी वैयक्तिक शौचालयांचा वापर करावा व परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन पाटील यांनी केले. शेल्टर असोसिएशन या संस्थेमार्फत राजेंद्रनगर, बोंद्रेनगर येथे एक घर, एक शौचालय योजनेंतर्गत उभारलेल्या ५६६ शौचालयांचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अमल महाडिक, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, नगरसेविका रूपाराणी निकम, प्रतिमा जोशी, लता श्रीखंडे, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री पाटील म्हणाले, शहरात साडेसहा हजार वैयक्तिक शौचालयांची आवश्यकता असून, शेल्टर असोसिएशन या संस्थेने ५६६ शौचालयांची उभारणी केली आहे. येत्या काळात उर्वरित शौचालये लवकरच बांधण्यात येतील. दोन वर्षांत स्वच्छता, प्रामाणिकता, सुरक्षा यांबाबतच्या कल्पना बदलत आहेत. आपणही गरीब कुटुंबातील असून, आपलीही सुरुवात झोपडपट्टीतील घरातूनच झाली आहे. त्यामुळे तळागाळातील घटकांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कटिबद्ध असून एक घर, एक शौचालय या प्रकल्पाला सर्वतोपरी मदत करू, त्यासाठी महानगरपालिकेचे सहकार्य घेऊ. राजेंद्रनगरमध्ये ५०० घरांमध्ये स्वच्छतागृहे राजेंद्रनगर येथे ५०० घरांमध्ये स्वच्छतागृहे बांधली आहेत, तर बोंद्रेनगर झोपडपट्टीत ६६ घरांमध्ये काम सुरू आहे. अतिशय अपुरी खोली असली तरी तिथे उपलब्ध जागेचा वापर करून स्वच्छतागृहे बांधली आहेत. यासाठी संस्थेने बांधकामासाठी लागणारे साहित्य लाभार्थ्यांना मोफत दिले आहे. एका स्वच्छतागृहामागे संस्थेला १५ हजार रुपये खर्च येतो. बांधकामाची मजुरी मात्र संबंधित लाभार्थ्याने द्यायची आहे. पारेख फौंडेशनने जवळपास एक कोटीचा निधी या संस्थेला दिला आहे.
शहरात लवकरच प्रत्येक घरात शौचालय
By admin | Published: October 03, 2016 1:21 AM