कोल्हापूर : शहरवासीयांना टोल रद्द करण्याचे भाजपने दिलेले आश्वासन पूर्ण केले असून, आता टोल रद्द झाला आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने ‘आयआरबी’ला पैसे भागविण्याबाबतचे पत्रही दिले आहे. त्यामुळे आता वेगळी अधिसूचना काढण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्टीकरण पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिले. पालकमंत्री विविध बैठकांच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते, त्यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. टोल रद्दचा निर्णय झाला; परंतु अद्याप राज्य सरकारने अधिसूचना काढलेली नाही, याकडे पालकमंत्री पाटील यांचे लक्ष वेधले असता त्यांनी सांगितले की, कोल्हापूरचा टोल रद्द करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शहरवासीयांना आम्ही निवडणूक काळात दिलेले एक आश्वासन पूर्ण केले. राज्य सरकार हा प्रकल्प ‘आयआरबी’चे सर्वच्या सर्व म्हणजे ४२८ कोटी रुपये देऊन विकत घेणार आहे. त्या संदर्भात राज्य रस्ते विकास महामंडळाने तसे पत्र ‘आयआरबी’ला दिले आहे. आता महामंडळ व आयआरबी यांची एक बैठक होणे बाकी आहे. ‘आयआरबी’ला पत्र दिले असल्याने आता वेगळी अधिसूचना काढण्याची आवश्यकता राहिलेली नाही. अधिसूचना निघाली नाही म्हणून कोणी मनात शंका ठेवू नयेत. टोल रद्द झाला आहे. तो पुन्हा सुरू होणार नाही. हा विषय आता पूर्णपणे निकाली निघाला आहे. (प्रतिनिधी)
टोल रद्दच, अधिसूचनेची गरज नाही : पालकमंत्री
By admin | Published: January 31, 2016 1:37 AM