कोल्हापूर : आयआरबी कंपनीची टोल वसुली बंद होऊन चार वर्षे झाले तरी नाक्यासाठी उभारलेले शेड मात्र, कायम आहेत. नाक्याजवळील गतीरोधक, दुभाजक रात्रीच्यावेळी अपघाताला निमंत्रण देत आहेत. आयआरबीचे शेड जीवघेणे ठरत आहेत. त्यामुळे महापालिकेने तातडीने शेड हटविण्याची मागणी जोर धरत आहे.
कोल्हापूर शहरातील ४९.९९ किलोमीटरचे रस्ते बांधा वापरा आणि हस्तांतर करा या तत्त्वानुसार करण्यात आले. आयआरबी कंपनीला हा ठेका दिला. कंपनीने शहराच्या प्रवेशद्वाराजवळ ९ ठिकाणी टोलेजंग असे नाके उभारले. या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध होत गेला. अंतर्गत रस्त्यासाठी टोल का द्यायचा, ही भूमिका घेत टोल विरोधी कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनात अखंड कोल्हापूरकर सहभागी झाले.
नाक्यांची जाळपोळही करण्यात आली. सात वर्षांच्या आंदोलनानंतर टोल हटविण्यात आला. राज्यात भाजप सरकार सत्तेवर असताना आयआरबी कंपनीचे सर्व पैसे भागविले. याला चार वर्ष झाले तरी आयआरबीचे शेड अद्यापही कायम आहेत. येथील गतीरोधक, दुभाजक वाहतुकीस अडथळा ठरतच आहेत. रात्रीच्यावेळी अपघाताच्या घटनाही वाढल्या आहेत.नाकेच बंद झाले आहेत, मग शेड का ठेवले आहेत. वाहनांची तपासणीच येथे होत नसेल तर गतीरोधक, दुभाजक काय कामाचे आहेत. अंधारावेळी यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, तत्काळ शेड, दुभाजक हटविले पाहिजेत. तेजस्विनी अभिजित पाटील, हनुमाननगर, शिये
आयआरबीचे सर्व पैसे भागविल्यानंतर त्यांच्या मालमत्तेचे एकतर्फी हस्तांतर करण्यात येणार होते. मात्र, हे योग्य ठरणार नसल्यामुळे पंचनामा करून रितसर हस्तांतरण केले जाणार आहे. त्यानंतरच शेड हटविण्याचा निर्णय होईल, अशी माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे.टोल बंद असतानाही दुभाजक कायम असून अपघाताला निमंत्रण देत आहेत.आयआरबी कंपनीने जरी कोल्हापुरातून पळ काढला असला तरी त्यांची कार्यालये आजही नाक्यांच्या परिसरात आहेत. शाहू नाका येथे धूळ खात कार्यालय पडले आहे.-----------------------------------------------