जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर महामार्गावरील टोलनाक्याला तीव्र विरोध दर्शविण्यासाठी येत्या ४ एप्रिलला जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्याबरोबरच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना टोलप्रश्नी साकडे घातले जाणार आहे़ पालकमंत्र्यांकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास रस्त्यावरची लढाई करण्याचा निर्धार टोलविरोधी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने करण्यात आला़ यावेळी टोलला कायम विरोध करीत सांगली-कोल्हापूर महामार्ग हा रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गात विलिनीकरण करावा़ जयसिंगपूर व हातकणंगले येथे उड्डाणपूल उभारण्यात यावा, तसेच सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यापक कृती समितीची स्थापना करण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष युवराज शहा होते़ येथील नगरपालिकेच्या दे़ भ़ रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहात रविवारी टोलविरोधी सर्वपक्षीय कृती समितीची बैठक झाली़ यावेळी आमदार उल्हास पाटील म्हणाले, शासनाकडून शिरोळ तालुक्यात टोलचा तिसऱ्यांदा प्रयत्न झाला आहे़ येथील जनतेने नेहमीच टोलला विरोध केला आहे़ शिरोली व अंकली येथे होणारे टोलनाके हद्दपार करून टाकण्यासाठी सर्वपक्षीय लढ्याची गरज आहे़ मी सत्तेतील आमदार असलो तरी प्रथम चळवळीचा कार्यकर्ता म्हणून तुमच्या या लढ्यात अग्रभागी राहणार आहे़ टोल द्यायचा नाही आणि मागेही हटायचे नाही, असा निर्धार करून कोल्हापूरप्रमाणेच हाही टोल हाणून पाडण्याचे आवाहन त्यांनी केले.शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, टोलविरोधी लढा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी संघटितपणे लढा देऊन टोलचे भूत हाणून पाडण्यासाठी शासनाशी भांडू व टोल हद्दपार करू.शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सतीश मलमे म्हणाले, कोल्हापूरप्रमाणेच हाही टोल हाणून पाडण्यासाठी संघटित लढा उभारणे गरजेचे आहे़ रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असताना टोल कशासाठी? टोल बंद करण्यासाठी मंत्र्यांच्या गाड्याही अडवायला शिवसेना मागे-पुढे बघणार नाही़ ‘स्वाभिमानी’चे जिल्हा परिषद सदस्य सावकर मादनाईक म्हणाले, चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे़ त्यातच टोलची घाई असलेल्या कंपनीनेच रस्त्याचा दर्जा तपासावा. मगच टोल उभारणीला हात घालावा़ टोलला टोला देण्यासाठी शिरोळची जनता सज्ज आहे़ कॉ़ रघुनाथ देशिंगे म्हणाले, टोलमुक्तीचे आश्वासन देऊनच सरकार सत्तेवर आले आहे़ टोल सर्वसामान्य नागरिकांच्या मानगुटीवर बसविण्याचे काम शासन करीत आहे़ त्यामुळे या सरकारने टोलमुक्तीची घोषणा लक्षात घेऊन या मार्गावरील टोलनाका रद्द करावा; अन्यथा जनता टोलनाका उधळून लावेल. अॅड़ संभाजीराजे नाईक, मिलिंद भिडे, राजेंद्र दार्इंगडे, बाळासाहेब कलशेट्टी, रमेश शिंदे, पृथ्वीराज पवार, भगवान जांभळे, दिलीप माणगावे, चंद्रकांत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दरगू गावडे, धनाजी चुडमुंगे, प्रकाश झेले, शैलेश आडके, सूरज भोसले, प्रकाश पाटील-टाकवडेकर, साजिदा घोरी, मधुकर पाटील, मिलिंद साखरपे, बजरंग खामकर यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
टोलप्रश्नी रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्धार
By admin | Published: March 28, 2016 12:53 AM