कोल्हापूर : निवडणुकीच्या धामधुमीतही टोलविरोधी आंदोलनाचा धुरळा उडाला आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूरच्या टोलप्रश्नी येत्या सोमवारी (दि. २९) मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. शासनस्तरावर टोलचा प्रश्न प्रलंबित पडल्याने कोल्हापूरकरांचे टोलमुक्तीसाठी उच्च न्यायालयाकडे लक्ष लागून राहिले आहे.मुंबई उच्च न्यायालयाने २१ एप्रिल २०१४ रोजी दिलेल्या निकालात कोल्हापूर शहरातील टोलवसुलीच्या स्थगितीचा अंतरिम आदेश रद्द करण्यास तात्पुरता नकार दिला होता. उच्च न्यायालयाची ही स्थगिती सर्वाेच्च न्यायालयाने ५ मे २०१४ रोजी उठविली होती. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने फेरविचार करून ३१ जुलैपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.मुंबई उच्च न्यायालयाने २२ सप्टेंबरची टोलबाबत अंतिम सुनावणी आयआरबीच्या मागणीनुसार २९ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानेच ही सुनावणी होणार असल्याने टोलबाबतचा हा निर्णय अंतिम असणार आहे. न्यायिक स्तरावर टोलचा कायमचा निकाल लागणार आहे. शहर एकात्मिक रस्ते प्रकल्पात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे बेकायदेशीर टोलवसुली रद्द करावी, अशी प्रमुख मागणी सर्वपक्षीय कृती समितीतर्फे उच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
टोलप्रश्नी सोमवारी सुनावणी
By admin | Published: September 23, 2014 12:37 AM