संदीप बावचे
शिरोळ : नैसर्गिक आपत्तीच्या ओझ्याने शेतकरी हतबल झाला असताना दर गडगडल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या टोमॅटोला दोन ते तीन रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडले आहेत.
मुंबई, अहमदाबाद बाजारपेठांतदेखील टोमॅटोला दर कमी मिळत आहे. त्यामुळे मालाचा उठाव होत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यास मार्केट कमिट्यांना शासनाने आदेश देऊन शेतकरीहिताचे धोरण राबविण्याची गरज आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात दहाहून अधिक तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात भाजीपाला घेतला जातो. गेल्या २५ वर्षांपासून भाजीपाला क्षेत्रात शिरोळ, हातकणंगले तालुक्यांनी आपले नाव राज्यभरात कमाविले आहे. नांदणी, दानोळी, मजरेवाडी, अब्दुललाट, अकिवाट यांसह परिसरातून अनेक शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेतात. एकेकाळी टोमॅटोचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरोळ तालुक्यात टोमॅटोचे क्षेत्र कमी झाले असले तरी कमी-जास्त प्रमाणात शेतकरी उत्पादन घेत आहेत. भाजीपाल्याला अनिश्चित दर, रोगांचा वाढलेला प्रादुर्भाव, नैसर्गिक आपत्ती यातून मार्गाक्रमण करीत शेतकरी उभारत असताना मुंबई, अहमदाबाद बाजारपेठेत मागणी नसल्यामुळे वीस किलोच्या क्रेटला शंभर रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
टोमॅटोच्या एका एकरासाठी दीड लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च येतो. मात्र, दर पाहता विक्रीतून साधा उत्पादन खर्चही निघत नाही. आठवडी बाजार बंद असल्याने शिवाय मालाची आवक वाढल्याने उठाव होत नसल्याचे व्यापारी सांगतात. मुंबई बाजारपेठेत पाच ते सात, तर अहमदाबादमध्ये आठ ते दहा रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून माल पाठविण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
कोट -
१६६ कॅरेट टोमॅटो लिलाव बाजारात पाठविले होते. काढणी व वाहतूक असा चार हजार रुपये खर्च आला; परंतु हातात ८८८ रुपयेच मिळाले. त्यामुळे मार्केटला टोमॅटो पाठविला नसल्याने जवळपास चार हजार कॅरेट मालाचे नुकसान झाले आहे.
- रवी खुरपे, शेतकरी मजरेवाडी
कोट -
दर पडल्याने टोमॅटो काढणी व वाहतुकीचा खर्च देखील सोसावा लागत आहे. गतवर्षी श्रावणामध्ये चांगला दर होता. यंदा परिस्थिती उलट झाली आहे. त्यामुळे केंद्राने शेतकऱ्यांसाठी ठोस धोरण राबविण्याची गरज आहे.
- बाळासाहेब पाटील, शेतकरी, नांदणी.
फोटो - २८०८२०२१-जेएवाय-०१-टोमॅटो