कोल्हापूर : गणेशोत्सवात ५० ते ८० रुपये पावशेर या दराने विकला गेलेला झेंडू आता याच दरात किलोवर विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. अवघ्या १५-२० दिवसांच्या कालावधीतच दरात कमालीची घसरण झाल्याने फूल उत्पादक शेतकरी नाराज आहे. दसऱ्यानिमित्त शहरात झेंडूचे ढीग लागले होते. ३० रुपयांना अर्धा किलो याप्रमाणे दर होता.
बाजार समितीत सौद्याला दरात घसरण झाली असतानाही किरकोळ बाजारात कांदा आणि टोमॅटो मात्र चढ्या दरानेच विकले जात आहेत. उच्च प्रतीचा कांदा व टोमॅटो ५० रुपये किलो दराने विकला जात आहे. खाद्यतेल, डाळींसह भाजीपाल्याचेही दर गत आठवड्याइतकेच स्थिर आहेत. नारळही बऱ्यापैकी स्वस्त झाले आहेत. ओली भुईमूग शेंग बाजारात आली असून १०० रुपये किलोला दर निघाला आहे.लक्ष्मीपुरीतील आठवडा बाजारात फेरफटका मारला असता, भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसले. दरही आवाक्यात आले आहेत. गवार अजूनही ८० रुपये किलो आहे. फ्लॉवर ३० ते ६० रुपये गड्डा असा दर आहे. याव्यतिरिक्त उर्वरित सर्वच फळभाज्यांचे दर ३० ते ५० रुपये किलो या पटीतच आहेत. मेथी, पालक, शेपू, कांदापात, पोकळा या भाज्या १० रुपये पेंढी आहेत. कोथिंबीर पेंढीचा दर पाच ते १० रुपये आहे.बाजारात कांदे, टोमॅटोची आवक जास्त आहे. निर्यातबंदीमुळे कांद्यांचे घाऊक बाजारातील दर १० किलोंना ३०० रुपये आहेत; पण प्रत्यक्षात किरकोळ बाजारात मात्र अजूनही ४० ते ५० रुपये किलो असाच कांदा विकला जात आहे. टोमॅटोचेही तसेच आहे. घाऊक बाजारात २०० रुपयांना १० किलो दर असताना बाजारात मात्र तो ४० ते ५० रुपयांनाच विकला जात आहे.दसरा, दिवाळीमुळे खाद्यतेल आणि डाळींना मागणी गृहीत धरून दुकाने फुल्ल झाली आहेत. दर मात्र स्थिरच आहेत. हरभराडाळ ७० रुपये आहे. उडीद, मसूर, मूगडाळ ८० रुपये आहे. तूरडाळ ९० रुपयांवर स्थिर आहे. मैदा ३६ रुपये आहे. शेंगदाण्याचे दर १३० वरच्या गेले आहेत. गहू व ज्वारी ३२ ते ३६ रुपयांवर आहे. साखर ३८ वर पोहोचली आहे. खाद्यतेलामध्ये सरकी ९०, सोयाबीन व सूर्यफूल १००, शेंगतेल १३० रुपये किलो आहे. सणासुदीला नारळाची मागणी वाढत असली तरी दर मात्र कमीच आहे. १२ ते २५ रुपये नग असा दर आहे.