जोतिबा : दख्खनचा राजा जोतिबा देवाची उद्या, शनिवारी चैत्र पौर्णिमा यात्रा होत आहे. यात्रेचा मुख्य दिवस शनिवार असून, डोंगरावर गुरुवार रात्रीपासून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होत आहेत.
चैत्र यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाठी मिरवणुकीसाठी मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर दाखल होत आहेत. चांगभलंच्या गजराने अवघा डोंगर दुमदुमून गेला आहे. डोंगरवाटा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. बैलगाडी, खासगी वाहनातून, चालत भाविक डोंगरावर दाखल झाले आहेत. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या यंदाच्या यात्रेला ४० टक्के भाविक येतील असा अंदाज केला जात आहे.
जोतिबा मंदिरात पहाटे तीनपासून धार्मिक विधी सोहळ्यास प्रारंभ होईल. पाच वाजता महाभिषेक महापूजा होईल. १० वाजता धुपारती सोहळा होईल. जोतिबा डोंगरावरील सासनकाठ्याची मिरवणूक मुख्य आकर्षण असते. चैत्र यात्रेत गुलाल-खोबरे, बंदी नाणी यांची पालखीवर होणारी उधळण अनोखी असते. सासनकाठ्या चाळीस फूट उंचीच्या असतात. रंगीबेरंगी कपड्यांनी सजविलेल्या सासनकाठ्या आकर्षक व सुंदर दिसतात.
काही काठ्यांना नोटांच्या आणि फुलांच्या माळा असतात. हलगी, पिपाणी, तुतारी, सनईच्या तालावर काठ्या विशिष्ट पद्धतीने नाचविल्या जातात. भरउन्हात तरुणवर्ग गुलालात चिंब होऊन नाचतो. सर्वांच्या मुखात जोतिबाच्या नावाने चांगभलंचा अखंड गजर असतो. दुपारी १ वाजता सासनकाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ होईल. त्यावेळेस म्हालदार चोपदार तोफेच्या सलामीने मिरवणुकीस प्रारंभ होईल.
या मिरवणुकीमध्ये क्रमवारे पहिला मान इनाम पाडळी (जि. सातारा) या सासनकाठीचा, त्यानंतर मौजे विहे (ता. पाटण), करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज (ता. मिरज), कसबा सांगाव (ता. कागल), किवळ (जि. सातारा), कवठेएकंद (जि. सांगली) यांच्या मानाच्या १८ सासनकाठ्या सहभागी होतील. मान नसलेल्या ५७ आणि इतर २९ अशा एकूण ९६ सासनकाठ्या सहभागी असतात. या मिरवणुकीमध्ये २० फुटांपासून ते ७० ते ८० फुटांच्या उंचच उंच सासनकाठ्या सहभागी असतात. हस्त नक्षत्रावर दुपारी एक वाजता सासनकाठ्यांच्या मिरवणुकीस प्रारंभ होईल.
यावेळी तोफेच्या सलामीने जोतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे पालखी मार्गस्थ होईल. सायंकाळी साडेसहा वाजता यमाई मंदिरात यमाईदेवी व जमदग्नी यांच्या विवाह सोहळ्याचा धार्मिक विधी होईल. जोतिबा मंदिरात येऊन तोफेच्या सलामीने रात्री दहा वाजता पालखी सोहळ्याची सांगता होईल.