काेल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकतीसाठी उद्या, मंगळवारपर्यंत अवधी आहे. दोन दिवस बाकी असताना हरकती दाखल होण्याचे प्रमाण काही कमी होताना दिसून येत नाही. यादीत मोठा घोळ झाला असून, प्रभागातील शेकडो मते गायब झाली असल्याची हरकती दाखल होत आहेत. यासंदर्भात महापालिकेकडे रविवारी आणखीन १२१ हरकती दाखल झाल्या. आतापर्यंत ४३३ हरकती आल्या आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादीबाबत १६ मार्चपासून हरकती दाखल करण्यास सुरू झाले असून, ८१ प्रभागातून रोज हरकतींची संख्या वाढतच आहे. चार विभागीय कार्यालयांत हरकतीसाठी मतदारांसह माजी नगरसेवक, इच्छुकांची गर्दी होत आहे. उद्या, २३ मार्चपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत आहे. यानंतर दाखल झालेल्या हरकतींवर सुनावणी होणार आहे. ३ मार्च रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ८ मार्च रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, १२ मार्च रोजी अंतिम प्रभागनिहाय व केंद्रनिहाय मतदार याद्या जाहीर होणार आहेत.
चौकट
विभागीय कार्यालयात रविवारी दाखल झालेल्या हरकती
गांधी मैदान : ५२
शिवाजी मार्केट : ३०
बागल मार्केट : २६
ताराराणी मार्केट : १३