कोल्हापूर : फटाके, फराळ आणि दिव्यांची दिवाळी संपताच गावखेड्यापासून शहरांतील हौशी रंगकर्र्मींची हौस पूर्ण करणाऱ्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या तयारीसाठी सुरू असलेल्या नाटकांच्या तालमीने कलाकारांच्या रात्री जागू लागल्या आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ५६ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची पहिली घंटा सोमवारी (दि. ७) वाजणार असून, कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहांत विविध कलाकृतींचे सादरीकरण होणार आहे. राज्यभरातील नाट्य कलावंतांचा हक्काचा रंगमंच म्हणजे राज्य शासनाच्या वेगवेगळ्या नाट्य स्पर्धा. राज्यभरातील विविध केंद्रांवर ही स्पर्धा होत असून यंदा कोल्हापूर केंद्रावर एकूण २१ संस्था आपल्या कलाकृती सादर करणार आहेत. अंतर्मनाचा शोध घेत सकारात्मक ते नकारात्मक विचारसरणीचा संघर्ष ‘आपुलाच वाद आपुल्याशी’ धाटणीच्या नाटकांसह ऐतिहासिक ते वर्तमानकाळात जगाला भेडसावणाऱ्या दहशतवादाच्या समस्येपर्यंत असे बहुअंगी आशयघन कलाकृतींची पर्वणी रसिकांना मिळणार आहे. अगदी थोडेच दिवस शिल्लक असल्याने कलाकारांच्या तयारीला वेग आला असून संवादफेक, रंगमंचांचा वापर, हावभाव, संवाद पाठांतर, आदी गोष्टींवर भर देण्यात येत आहे. राज्य नाट्यस्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातील अनेक कलाकारांना या स्पर्धेमुळे व्यासपीठ उपलब्ध होते. ‘व्यावसासिक रंगभूमीवरील प्रवेशाचे प्रवेशद्वार’ म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते. कोल्हापूर केंद्रावर सादर केल्या जाणाऱ्या नाटकांमध्ये कोल्हापूर शहरातील दिग्गज संस्थांसह बेळगांव, इचलकरंजी, पन्हाळा, आजरा, भुयेवाडी, गडमुडशिंगी या भागांतील संस्थाही आपल्या कलाकृती सादर करणार आहेत. गेली दोन दशके प्रायोगिकसह व्यावसायिक रंगमंच गाजविणाऱ्या ‘प्रत्यय’, ‘अभिरूची’, ‘प्रतिज्ञा’, ‘देवल क्लब’, आदी नाट्यसंस्था यंदाच्या स्पर्धेत सहभागी झाल्या नाहीत. त्यामुळे यावेळी नव्या संस्थांच्या सादरीकरणावर रसिकांची नजर असणार आहे. सांस्कृतिक क्षेत्रात आपली ओळख बनविलेल्या ‘हृदयस्पर्श हौशी सांस्कृतिक व्यासपीठ यंदा पहिल्यांदाच राज्य नाट्यस्पर्धेचे अग्निदिव्य पेलण्यास सज्ज झाली आहे. पद्माकर कापसे व सुनील माने यांच्या दिग्दर्शनाखाली नाटकाच्या रंगीत तालमीला वेग आला आहे. नव्या दमाच्या हौशी कलाकारांना संधी देत परिवर्तन कला फाउंडेशनतर्फे दोन हजार वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या ग्रीक नाटकावरील कलाकृतींतून कायदा व मानवी मूल्यांच्या संघर्षावर ‘आन्तिग्वान’वर प्रकाश टाकण्यात येणार आहे. एरव्ही विनोदी, हलक्या-फुलक्या नाटकांचे सादरीकरण करणारी फिनिक्स यंदा मानवी मनाला अंतर्मुख करणाऱ्या व थोडीशी गंभीर मांडणी असलेल्या तीस कलाकारांचा समावेश असलेल्या ‘खेळीमेळी’ या नाटकाद्वारे स्पर्धेत उतरत आहे. दिग्गज संस्था येणार कोल्हापूर केंद्रावर सादर केल्या जाणाऱ्या नाटकांमध्ये कोल्हापूर शहरातील दिग्गज संस्थांसह बेळगांव, इचलकरंजी,पन्हाळा, आजरा, भुयेवाडी, गडमुडशिंगी या भागांतील संस्थाही आपल्या कलाकृती सादर करणार
तालमीने जागू लागल्या रात्री...!
By admin | Published: November 03, 2016 1:00 AM