कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासूनच्या कामगिरीचा आढावा घेणारे ‘गाथा ग्रामविकासाची’, ‘कोल्हापूर जिल्हा परिषद काल, आज आणि उद्या’ या पुस्तकांचे प्रकाशन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. उद्या, शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती सभागृहामध्ये हा कार्यक्रम होईल. अक्षर दालन प्रकाशनचे अमेय जोशी यांनी ही माहिती दिली.
‘लोकमत’चे वरिष्ठ पत्रकार समीर देशपांडे यांनी लिहिलेल्या या पुस्तकामध्ये भारतामध्ये पंचायत राज व्यवस्थेचा उदय, यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात केलेली अंमलबजावणी, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकल बोर्डाच्या कार्यापासून ते महापूर, कोरोनाच्या काळात जिल्हा परिषदेने केलेली कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे. ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन जोशी यांनी केले आहे.
१६१२२०२० कोल गाथा