बांबवडे : गोगवे पैकी तळपवाडी (ता. शाहूवाडी) येथील जवान सावन बाळकू माने हे शहीद झाल्याचे वृत्त समजताच गावावर शोककळा पसरली आहे. मात्र, शहीद जवान माने यांच्या घरी रात्री उशिरापर्यंत ही माहिती समजू दिली नव्हती. दरम्यान, उद्या दुपारपर्यंत पार्थिव दिल्लीमध्ये दाखल होवून, शनिवारी सकाळपर्यंत गावामध्ये पोहचेल, असे सांगण्यात आले.जवान सावन माने हे चार वर्षांपूर्वी भारतीय सैन्यात दाखल झाले होते. ते अविवाहित होते. त्यांचे वडील बाळकू माने हे लष्करातून निवृत्त झाले आहेत. तर मोठा भाऊही लष्करात सध्या आसाम येथे सेवेत आहे. सध्या त्यांच्या घरी आई व वडील हे दोघेच राहतात. सावन माने शहीद झाल्याची बातमी सर्वत्र पसरली असली कुटुंबियांना ती कळू दिलेली नाही. ही बातमी ऐकुन त्यांच्या आई, वडीलांना धक्का बसू नये म्हणून गावातील केबलचे कनेक्शनही बंद केले आहे. गावातील प्रवेशद्वारावर व चौकात काही ग्रामस्थ एकत्र जमून चर्चा करत होते. तसेच हे वृत्त समजल्यानंतर येणाऱ्या पाहुण्यांना परत पाठवत होते.सावन माने यांचे वडील निवृत्तीनंतर गावात सावनसह केशकर्तनालयाचे दुकान चालवत होते. परंतु, पारंपरिक व्यवसायापेक्षा त्यांनी आपली दोन्ही मुले सैन्यात भरती केली. आपल्या मुलीचे लग्नसुद्धा एका सैनिकाबरोबर लावून दिले होते.
उद्या पार्थिव पोहोचणार
By admin | Published: June 23, 2017 1:07 AM