लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात कडक लॉकडाऊन केल्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यास मदत झाली आहे. हा लॉकडाऊन असाच पुढे ठेवायचा की राज्य सरकारचे निर्बंध लागू करायचे? याबाबत उद्या, रविवारी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्याच्या टास्क फोर्सच्या अहवालानुसार उपचारासाठी वेळाने दाखल झालेल्या रुग्णांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसते. तरीही खासगी रुग्णालयात मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने त्याचे फेरऑडिट करणार आहे. यासाठी टास्क फोर्सला पुन्हा विनंती करणार असून, खरोखरच वेळाने दाखल झाल्याने रुग्ण दगावलेत हे समजू शकतो, मात्र पैसे मिळणविण्यासाठी रुग्णालये काम करत असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
‘गोकुळ’चा लवकरच आढावा घेणार
‘गोकुळ’मध्ये कोणाचे टँकर बंद करायला, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करायला आम्ही सत्ता मिळवलेली नाही. पारदर्शक व काटकसरीचा कारभार करून उत्पादकांना अधिकाधिक दर द्यायचा आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह इतर नेत्यांना घेऊन लवकरच आढावा घेणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. उपाध्यक्ष पदाबाबत सर्वसाधारण सभेत पोटनियम दुरूस्ती करावी, असेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या राजीनाम्यानंतर पदाधिकारी बदल
जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक पदाधिकारी शिवसेनेचे असून, त्यांचे राजनीमे झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीचे राजीनामे घेतले जातील. त्यानंतरच पदाधिकारी बदल होऊ शकतो, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
रेमडेसिविर टंचाईमुळेच मृत्यू वाढले
जागतिक आरोग्य असोशिएशनने कोरोनावर रेमडेसिविर ही संजीवनी नाही, असे म्हटले आहे. आपण त्यातील तज्ज्ञ नाही, मात्र रेमडेसिविरची टंचाई झाल्यापासून मृत्यूचे प्रमाण वाढले. त्यामुळे रेमडेसिविर कोरोनावरील संजीवनी नसेल; मात्र रामबाण औषध असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.